Saturday, November 14, 2026

थरकाप उडवणारी घटना! नेपाळमधील गोरख्यात कोसळली महाकाय दरड; बूढी गंडकी नदीचा प्रवाह रोखला जाणार का?

नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातील धार्चे येथे एका जंगलात मोठी कोरडी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. काही माती आणि दगड बूढी गंडकी नदीत पडले असले, तरी सुदैवाने नदीचा प्रवाह अडवला जाण्याचा कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

काठमांडू : शेजारील देश नेपाळमधून एक मोठी आणि चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला असून, येथील धार्चे परिसरातील ठाडो भर्यांगच्या दाट जंगल परिसरात अचानक एक महाकाय कोरडी दरड कोसळली. या अकल्पित घटनेमुळे परिसरात काही काळ तीव्र भीतीचे वातावरण पसरले होते. दरड कोसळल्यानंतर उडालेली प्रचंड धूळ थेट नजीकच्या रस्त्यापर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

?feature=share

नदीत मातीचा ढिगारा, पण धोक्याची शक्यता नाही

प्राप्त माहितीनुसार, ही दरड सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. दरड कोसळल्यानंतर काही प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा थेट खाली वाहणाऱ्या बूढी गंडकी नदीत जाऊन पडला. त्यामुळे नदीचा प्रवाह रोखला जाऊन पूर परिस्थिती निर्माण होईल का, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, स्थानिक गावपालिकेचे अध्यक्ष लक्ष्मण गुरूंग यांनी तातडीने स्पष्टीकरण देत मोठा दिलासा दिला आहे. अध्यक्ष गुरूंग यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे, तो परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि तीव्र उताराचा डोंगराळ भाग आहे. बूढी गंडकी नदीत अतिशय अल्प प्रमाणात दगड आणि माती गेली असून, सध्या नदीचा मार्ग बंद होण्याची कोणतीही शक्यता नाही. भविष्यात आणखी मोठा ढिगारा आल्यास परिस्थिती वेगळी असू शकते, परंतु सध्या तरी पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस प्रशासन सतर्क, जीवितहानी टळली

या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गोरखा जिल्हा पोलीस कार्यालयाने तातडीने सूत्रे हलवली. गोरखाचे पोलीस अधीक्षक (एसपी) अनिल कुमार खड्का यांनी या दुर्घटनेला दुजोरा देताना सांगितले की, या भीषण दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद झालेली नाही. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवली जात असून, रस्ता आणि नदीकाठच्या परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे काही तासांसाठी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असली, तरी प्रशासनाच्या या स्पष्टीकरणाने मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >