नामसाई : भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी 14 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथील प्रसिद्ध गोल्डन पॅगोडा येथे दाखल झाल्या आहेत. राज्यातील अस्थी प्रदर्शनाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा असून, 20 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना या पवित्र अस्थींचे दर्शन घेता येणार आहे. राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक (निवृत्त) यांनी पवित्र अस्थींचे स्वागत करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
गोल्डन पॅगोडा येथे पवित्र अस्थींची स्थापना
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार, नालुंग हेलिपॅड येथे औपचारिक स्वागत केल्यानंतर भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी गोल्डन पॅगोडा (कोंगमु खाम) येथे आणून स्थापित करण्यात आल्या. यावेळी अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चौना मीन, राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि बौद्ध धर्मगुरू उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना राज्यपाल परनाईक यांनी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी या त्यांच्या जीवनाचे, ज्ञानप्राप्तीचे आणि शाश्वत शिकवणीचे प्रतीक असल्याचे सांगितले. सध्याच्या संघर्ष, असहिष्णुता आणि हिंसाचाराच्या वातावरणात बुद्धांचा शांतता, करुणा, ज्ञान आणि अहिंसेचा संदेश अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी ही मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारून सद्भावना आणि परस्पर आदरावर आधारित समाज निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गोल्डन पॅगोडा येथे दोन विशेष प्रदर्शनांचे उद्घाटन
या प्रदर्शनासोबतच गोल्डन पॅगोडा येथील ध्यान केंद्रात दोन विशेष प्रदर्शनांचेही उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या वतीने आयोजित 'अनअर्थिंग द सेक्रेड पिपरहवा : द स्टोरी ऑफ द होली बुद्धा रेलिक्स अँड देअर डिस्कव्हरी' या प्रदर्शनात उत्तर प्रदेशातील पिपरहवा येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून समोर आलेल्या ऐतिहासिक बाबी मांडण्यात आल्या आहेत. भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व तसेच पिपरहवा रत्नसंग्रहाचा प्रवासही या प्रदर्शनातून उलगडण्यात आला आहे. एका शतकाहून अधिक काळानंतर 2025 मध्ये या रत्नसंग्रहाचे भारतात झालेले पुनरागमन हा प्रदर्शनातील महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'क्रॉसरोड्स ऑफ धम्मा : क्लासिकल लेगेसीज, लिव्हिंग आर्ट अँड अँथ्रोपोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हज' या दुसऱ्या प्रदर्शनात बौद्ध धर्माची कला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यात आला आहे.
International Film Festival: 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार ब्रिक्स देशांतील 21 चित्रपटांचे सादरीकरण
57 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी 2026 मध्ये ब्रिक्स देशांतील चित्रपटांचे विशेष दालन असणार आहे. या विभागामध्ये समाविष्ट चित्रपटांच्या विषयात, ...
तवांग आणि बोमडिला येथे 66 हजारांहून अधिक भाविकांचे दर्शन
अरुणाचल प्रदेशात यापूर्वी दोन ठिकाणी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बोमडिला येथील थुबचोग गत्सेल लिंग मठात 8 ते 13 नोव्हेंबरदरम्यान सहा दिवसीय प्रदर्शन पार पडले. या काळात 35 हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. त्याआधी 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरदरम्यान तवांग मठात आयोजित प्रदर्शनाला 31 हजारांहून अधिक भाविकांनी भेट दिली. अशा प्रकारे तवांग आणि बोमडिला या दोन ठिकाणी मिळून 66 हजारांहून अधिक भाविकांनी भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले.
13 वर्षांनंतर अरुणाचल प्रदेशात प्रदर्शन
अरुणाचल प्रदेशात तब्बल 13 वर्षांच्या अंतरानंतर भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नामसाई येथील गोल्डन पॅगोडामध्ये 14 ते 20 नोव्हेंबरदरम्यान भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी या पवित्र अस्थी नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात परत नेण्याचे नियोजन आहे.