लखनौ : उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत राज्यातील आणखी 25 लाख तरुणांना टॅब्लेट वितरित करण्यात येणार आहेत. तसेच, येत्या 26 जानेवारीपर्यंत 1 लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनानिमित्त लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चार जिल्ह्यांतील 53 हजार विद्यार्थ्यांना टॅब्लेटचे वाटप
लखनौ येथील राष्ट्रीय प्रेरणा स्थळावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ, सीतापूर, हरदोई आणि उन्नाव या 4 जिल्ह्यांतील 53 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना टॅब्लेटचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 60 लाख तरुणांना टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 25 लाख तरुणांना डिजिटल उपकरणे देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, टॅब्लेट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी या उपकरणांचा वापर ज्ञान वाढवण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी करावा.
18 हजारांहून अधिक अभ्यासक्रमांसाठी मोफत डिजिटल साहित्य
इन्फोसिसच्या सहकार्याने सरकारने 18 हजारांहून अधिक अभ्यासक्रमांसाठी मोफत डिजिटल अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये योगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डीप टेकसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे. 'युवा साथी' ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना, पंतप्रधान इंटर्नशिप योजना, मुख्यमंत्री युवा उद्योजकता विकास मोहीम आणि पीएम मुद्रा योजना यांसारख्या सरकारी योजनांची माहिती मिळणार आहे. कोविड-19 महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी 25 डिसेंबर 2021 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. तरुणांना डिजिटल उपकरणे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. तरुणांच्या मागणीनुसार आता स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेटला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
साडेनऊ वर्षांत 9.5 लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्या
उत्तर प्रदेश सरकारने गेल्या साडेनऊ वर्षांत 9 लाख 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 8 हजार लेखापाल आणि 32 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या त्यांची पडताळणी सुरू आहे. पडताळणीच्या कारणास्तव नियुक्तीपत्रे देण्यास विनाकारण विलंब करू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, पुढील 10 दिवसांत 42 हजार होमगार्डना नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभाग, लोकसेवा आयोग आणि अधीनस्थ सेवा निवड आयोगामार्फतही मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन
मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या ...
सपावर योगी आदित्यनाथ यांचा निशाणा
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार टीका केली. पूर्वी भरतीची घोषणा होताच काका-पुतण्याची जोडी पैसे उकळण्यासाठी सक्रिय व्हायची, असा आरोप त्यांनी केला. सपा सरकारच्या काळात तरुणांना नोकऱ्या मिळण्याऐवजी 'मुन्नाभाई' तयार झाले. एकाने परीक्षा द्यायची आणि नियुक्ती मात्र दुसऱ्याला मिळायची, अशी टीका त्यांनी केली. सध्याच्या सरकारच्या काळात भरती प्रक्रिया पारदर्शक आणि प्रामाणिकपणे राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. परीक्षा आणि भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रह्मोस प्रकल्पातून 500 तरुणांना रोजगार
लखनौमधील ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पामुळे उत्तर प्रदेशातील 500 तरुणांना रोजगार मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सरदार पटेल आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रे स्थापन करण्याची योजनाही त्यांनी मांडली. उत्तर प्रदेशात सध्या 25 हजारांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असल्याचा दावा करत, देशातील 55 टक्के मोबाईल फोन आणि 60 टक्के इलेक्ट्रॉनिक घटकांचे उत्पादन उत्तर प्रदेशात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांच्या माध्यमातून राज्याच्या विकासावर भर
भारत हे जगातील सर्वात तरुण राष्ट्र असून, देशाच्या लोकसंख्येपैकी 56 टक्के लोकसंख्या तरुणांची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तर प्रदेशातही तरुणांचे प्रमाण मोठे असून, सरकार या लोकसंख्येला ओझे न मानता विकासाची ताकद मानत आहे. युवकांना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योगांच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.