सिंधुदुर्ग : दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी विमानतळावरून नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू झाली. फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या सेवेला प्रारंभ झाल्यानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी मुंबई ते चिपी असा विमानप्रवास केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगतानाच, चिपी विमानतळ आता पुन्हा बंद पडणार नाही, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सहकार्यामुळे विमानसेवा पुन्हा सुरू करणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ( Chipi Airport Latest News)
Prince William India Visit : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन आज मुंबईत दाखल होणार; अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी भारत दौरा
मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन हे तीन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत दाखल होणार आहेत. 2026 च्या अर्थशॉट ...
विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “आजचा दिवस आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आहे. या विमानतळाचे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर उज्ज्वल व्हावा, या स्वप्नाचे श्रेय नारायण राणे साहेबांना द्यावे लागेल. हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्या दिशेने काम करण्यासाठी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरित केले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर असा एकही आठवडा गेला नाही की राणे साहेबांनी मला आपल्या विमानतळाची आठवण करून दिली नाही. ‘नितेश, आपला एअरपोर्ट अजून सुरू झालेला नाही,’ असे ते सातत्याने सांगत असत. मीच नाही, तर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी, विशेषतः नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी संपर्क साधणे, पत्र देणे, भेटी घेणे, हा त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. आमचे मंत्री राममोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही त्यांनी ‘कुछ भी करके मेरा सिंधुदुर्ग एअरपोर्ट शुरू होना चाहिए’ असा आग्रह धरला. राणे साहेबांनी हा आग्रह आजपर्यंत सोडलेला नाही.
“राज्य सरकारला केंद्राकडूनही आवश्यक ते पाठबळ मिळाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) आणि केंद्रातील संबंधित यंत्रणांकडून सहकार्य मिळाल्यामुळे राज्य सरकारला विमानतळ पुन्हा सुरू करणे शक्य झाले. आजचा प्रवास सोपा नव्हता. याआधीही विमानसेवा सुरू होती, ती बंद पडली आणि आता किती दिवस चालणार, असे प्रश्न विचारणे सोपे आहे. मात्र, विमानतळ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही विमान कंपनीला एखाद्या विमानतळावरून सेवा सुरू करायची असेल, तर तेथील तांत्रिक सुविधा पूर्ण असणे आवश्यक असते. त्या पूर्ण झाल्याशिवाय फ्लाय ९१, इंडिगो किंवा अन्य कोणतीही कंपनी विमानसेवा सुरू करण्याचा विचार करत नाही. गेल्या दोन वर्षांत आम्ही या सर्व बाबी टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या. वीजपुरवठा, रस्ते, आवश्यक जागा अशा अनेक प्रश्नांवर काम केले. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची सुविधा म्हणजेच नाइट लँडिंगची व्यवस्था उपलब्ध करून घेतली. त्यामुळे स्पाइसजेट आणि इंडिगोसारख्या मोठ्या विमान कंपन्यांची विमानेही आता चिपी विमानतळावर उतरू शकतील. ( Sindhudurg Airport)
“फ्लाय ९१ सारख्या कंपन्या छोट्या शहरांमधील विमानतळांवर सेवा सुरू करताना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा विचार करतात. त्यामुळे सरकारसमोर सिंधुदुर्गची बाजू मांडणे आणि सरकारने त्याचा सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मानतो. सिंधुदुर्ग विमानतळाचा विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने मान्यता दिलेला तो एकमेव विमानतळाचा प्रस्ताव होता. ऑक्टोबर २०२६ पूर्वी विमानतळासाठी व्हीजीएफ (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) मिळाले नसते, तर विमानतळ सुरू होण्यासाठी आणखी किमान आठ महिने लागले असते. त्यासाठी आम्ही मुख्य सचिवांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट न पाहता पोस्ट-फॅक्टो मान्यता मिळवली आणि नंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्यामुळे २५ ऑक्टोबरची मुदत गाठता आली आणि किमान एक वर्ष वाचले.
“आम्ही एवढी मेहनत का केली, तर राणे साहेबांनी या जिल्ह्यासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाव्यात, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा विचार त्यांनी आमच्यासमोर मांडला आहे. त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी सिंधुदुर्गवासीयांना विश्वास देतो की सुरू झालेले हे विमानतळ आता पुन्हा बंद पडणार नाही. ही सेवा कायम सुरू राहील, असा शब्द मी आज देत आहे. यामागे अनेक लोकांची मेहनत आणि परिश्रम आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे प्रमुख दीपक कपूर हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी आम्हाला मोठी मदत केली. अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, तसेच कटकधोंड यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केले. या सर्वांचे मी कौतुक करतो.
“आमदार निलेश राणे, दीपक केसरकर किंवा असोत किंवा आम्ही सर्वजण असू, सिंधुदुर्गच्या आणि जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करत आहोत. राणे साहेबांच्या विचारानुसार सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आणून दाखवू, असा विश्वास मी जिल्हावासीयांना देतो. आज आपण नुसते विमानतळ सुरू करत नाहीत, तर रोजगाराची असंख्य साधने खुली करत आहोत. नागरिकांनी या विमानतळाकडे फक्त विमानातून प्रवास करण्याच्या दृष्टीने पाहू नये. जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांनी तयारी केली पाहिजे. विमानतळावर आणि पर्यटनाशी संबंधित क्षेत्रांत ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील, त्या स्थानिक मुला-मुलींनाच मिळतील, याची काळजी आम्ही घेऊ. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी उभ्या राहणाऱ्या गाड्याही या जिल्ह्यातील तरुण-तरुणींच्याच असल्या पाहिजेत; बाहेरच्या लोकांच्या नसाव्यात. त्यासाठी स्थानिकांनीही मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
शिर्डी आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होणार
- “आम्ही सर्वजण सिंधुदुर्गाचे सेवक म्हणून काम करत आहोत. सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि अजून तीन वर्षे बाकी आहेत. पहिल्या दोन वर्षांचा ट्रेलर एवढा भक्कम असेल, तर पाच वर्षांचा चित्रपट कसा असेल, याचा विचार तुम्ही करा,” असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
- रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक परवानग्या घेऊन आता हे विमानतळ कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज चिपी-सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. यापुढे इंडिगोची सेवा सुरू होणार आहे.
- तसेच शिर्डी आणि अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून रोजगाराची असंख्य साधने आणि संधी उपलब्ध होतील. नारायण राणे साहेबांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.