जगातील तीन प्रमुख अण्वस्त्रधारी देशांचे राष्ट्रप्रमुख प्रथमच एकाच मंचावर येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची 19 नोव्हेंबर रोजी चीनमधील शेनझेन शहरात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चीनने या बैठकीला अधिकृत दुजोरा दिल्याचे वृत्त आहे. आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ही बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अण्वस्त्र कपातीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी ?
या बैठकीत जागतिक सुरक्षेसह अण्वस्त्रांची संख्या कमी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हाइट हाऊसच्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प अण्वस्त्र कपातीचा प्रस्ताव मांडू शकतात. अमेरिकेची इच्छा आहे की चीननेही अण्वस्त्र नियंत्रणासंदर्भातील नव्या करारात सहभागी व्हावे. अंदाजानुसार, चीनकडे 600 हून अधिक अण्वस्त्रे आहेत, तर अमेरिका आणि रशियाकडे प्रत्येकी 5 हजारांहून अधिक अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे चीननेही अण्वस्त्र नियंत्रणाच्या चर्चेत सहभागी व्हावे, अशी अमेरिकेची भूमिका आहे.
मात्र, चीनने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत चीनकडे अण्वस्त्रांची संख्या कमी असल्याने सध्या अशा चर्चेत सहभागी होण्याची गरज नसल्याचे चीनचे म्हणणे आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अण्वस्त्र मर्यादित ठेवणारा शेवटचा करार फेब्रुवारी 2026 मध्ये संपुष्टात आला. त्यामुळे दोन्ही देशांवर असलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येवरील जुन्या मर्यादा संपल्या आहेत. आता चीनलाही सहभागी करून नवीन करार करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनिला दौऱ्याला सुरुवात; आसियान आणि क्वाड परिषदांमध्ये होणार महत्त्वपूर्ण चर्चा
ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते आसियान-भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत ...
इराण युद्धावरही चर्चा होण्याची शक्यता
या त्रिपक्षीय बैठकीत इराण युद्धाचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो. ट्रम्प यांनी यापूर्वी शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत इराणमधील युद्ध संपवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, युक्रेन युद्धाचा मुद्दा या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, युक्रेन प्रश्नावर स्वतंत्र चर्चा केली जाईल. चीनने मात्र या विषयावरील चर्चेत युरोपीय देशांचाही सहभाग असावा, अशी भूमिका मांडली आहे.
जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक
अमेरिका, रशिया आणि चीन या तीन महासत्तांमध्ये व्यापार, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरून अनेक मतभेद आहेत. रशिया आणि चीन यांच्यातील संबंध जवळचे असले, तरी अमेरिकेसोबत दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. अशा परिस्थितीत तिन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख एकत्र येऊन चर्चा करणार असल्याची बातमी जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतून अण्वस्त्र नियंत्रण, इराण युद्ध आणि जागतिक शांततेबाबत काही ठोस निर्णय होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.