
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आतापासूनच कंबर कसली आहे. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या मथुरा नगरीत भाजपचे एक मोठे आणि महत्त्वाचे चिंतन शिबिर भरवण्यात आले आहे. या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह पक्षाचे ४५ प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, संघटन महामंत्री बी. एल. संतोष, निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांचा समावेश आहे. मथुरेतील हे दोन दिवसीय मंथन संपल्यानंतर मुख्यमंत्री योगी आज सायंकाळी तातडीने दिल्लीला जाणार असून, तिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा करणार आहेत.
दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी महत्त्वाची खलबते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरेतील बैठक आटोपताच मुख्यमंत्री योगी दिल्लीच्या दिशेने रवाना होतील. दिल्लीत पोहोचल्यावर ते गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांच्यासोबत निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करतील. मथुरेत कालपासून २०२७ च्या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. या बैठकीत मित्रपक्षांसोबतचे जागावाटप, उमेदवारांची निवड, सोशल मीडियाद्वारे विरोधकांचा सामना करणे आणि विरोधकांच्या 'पीडीए' (PDA - पिछडा, दलित, अल्पसंख्याक) प्रचाराला चोख उत्तर देणे या विषयांवर सखोल मंथन होत आहे. यासोबतच, मतदार यादीतून (SIR) वगळल्या गेलेल्या नावांचा गंभीर विषयही या बैठकीत चर्चिला जात आहे.
सत्तेत पुनरागमन आणि विरोधकांच्या डावपेचांना शह
मथुरेतील या बैठकीच्या पहिल्या दिवशी सत्तेत पुन्हा येण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक समीकरणे कशी जुळवायची, यावर विशेष भर देण्यात आला. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या 'पीडीए' राजकारणाला कसा शह द्यायचा, हे भाजपसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. अखिलेश यादव यांचा चुनावी अजेंडा पूर्णपणे मोडून काढणे, हेच भाजपच्या सध्याच्या रणनीतीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसून येत आहे.
चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांचे दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२७ च्या संघाचे मार्गदर्शक (मेंटर) म्हणून ...
मथुरा मंथनातील भाजपचे प्रमुख संकल्प
पक्षाची पारंपारिक व्होटबँक अबाधित आणि एकजूट ठेवणे.
मागासवर्गीय आणि दलित समाजाला पक्षाशी अधिक घट्टपणे जोडून ठेवणे.
गाव आणि वॉर्ड पातळीवरील म्हणजेच बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणे.
मतदारांशी थेट संपर्क साधणारी 'पन्ना प्रमुख' यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लावणे.
सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
सरकार आणि पक्ष संघटना या दोघांमध्ये उत्तम समन्वय व ताळमेळ राखणे.
"अयोध्या झाली, आता मथुरेची बारी"; केशव मौर्य यांचे अखिलेश यांना आव्हान
निवडणूक चिंतनाचा आजचा दुसरा दिवस असून, ही बैठक मथुरेत घेण्यामागे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. अयोध्या आणि काशीनंतर आता आगामी २०२७ च्या निवडणुकीत मथुरेचा मुद्दा भाजपच्या मुख्य अजेंड्यावर असणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मोठे विधान केले आहे. "अयोध्या आपली झाली आहे, आता मथुरेची बारी आहे," असा नाराच त्यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, मथुरेत भव्य श्रीकृष्ण मंदिर बांधण्यासाठी आपल्यासोबत येऊन कारसेवा करण्याचे थेट आव्हानही त्यांनी अखिलेश यादव यांना दिले आहे. तसेच, २०२७ च्या निवडणुकीत भाजप उत्तर प्रदेशात विजयाची हॅट्ट्रिक करेल आणि अखिलेश यादव यांची सत्तेत येण्याची स्वप्ने भंग पावतील, असा ठाम विश्वासही मौर्य यांनी व्यक्त केला.






