मुंबई : मणिपूरमध्ये आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि भारत-जपान मैत्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. थंगजम धबाली सिंह यांना ‘वन इंडिया पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने मंगळवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात १७ वा 'वन इंडिया पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते डॉ. सिंह यांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. ते प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ आहेत. या पुरस्कार संकल्पनेचे जनक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव तसेच माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, माजी मंत्री भाई गिरकर हेही यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष, मानसिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे सरचिटणीस श्रवण झा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
मणिपूरमधील अनेक वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या शहरांमध्ये संधी शोधण्यासाठी स्थलांतरित होत असताना डॉ. थंगजम धबाली सिंह यांनी आपल्या राज्यातच राहून आरोग्यसेवेचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला. संघर्ष आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीतही त्यांनी प्रगत वैद्यकीय निदान आणि उपचार सुविधा स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. बबिना समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवण्याबरोबरच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या. मणिपूरमध्ये कर्करोग उपचार सुविधांचा पाया घालण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना राज्याबाहेर जाण्याची गरज कमी झाली, अशी माहिती यावेळी सुनील देवधर यांनी दिली.
अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप; नागपूरचा शौनक बडोले प्रथम
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतीकुमारजी ...
रुग्णालये, हॉटेल्स आणि प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील तरुणांसाठी रोजगार आणि व्यावसायिक प्रगतीचे मार्ग खुले केले. बेरोजगारी आणि अमली पदार्थांच्या व्यसनापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी आणि सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका आहे. मणिपूर टुरिझम फोरमचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठीही काम केले. इम्फाळ पीस म्युझियमच्या माध्यमातून मणिपूर आणि जपान यांच्यातील सामायिक इतिहासाचे जतन करून दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारत-जपान मैत्रीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत जपान सरकारने २०२० मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर रेज’ हा सन्मान प्रदान केला होता.
आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय मैत्री या विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत माय होम इंडियाने त्यांना १७ व्या ‘वन इंडिया पुरस्काराने’ सन्मानित केले. मणिपूरच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा गौरव असल्याचे तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी नमूद केले.