
नाशिक : आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दी, पावसाळी वातावरण आणि संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन तीन टप्प्यांमध्ये पोर्टा कॅबिन दवाखाने आणि रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून कुंभपर्वात तब्बल १५० आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तीन प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार
कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी तीन प्रकारच्या पोर्टा कॅबिनची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या प्रकारात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येईल. येथे रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले जातील. दुसऱ्या प्रकारात तीन खाटांचे छोटे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष, ऑक्सिजन सुविधा, औषधालय आणि प्रयोगशाळेची व्यवस्था असेल.
तिसऱ्या प्रकारातील रुग्णालय घाट परिसरात उभारण्यात येणार असून, येथे अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा उपलब्ध असेल. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खाटा, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला मोठ्या रुग्णालयात हलविण्यात येईल.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामांना वेग आला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनापासून ...
पावसाळ्यातील आजारांवर विशेष लक्ष
कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या पर्वण्या पावसाळ्यात येत असल्याने बदलते हवामान, अतिवृष्टी आणि अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तंबूतील दवाखान्यांऐवजी सुरक्षित आणि मजबूत पोर्टा कॅबिन रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय या तीन यंत्रणांच्या माध्यमातून उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. साधुग्राम, घाट परिसर, वाहनतळ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१० कोटींहून अधिक निधी मंजूर
या आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी १० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उभारणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी माहिती दिली.
कुंभमेळ्यानंतरही दवाखान्यांचा उपयोग
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कुंभमेळा संपल्यानंतरही या पोर्टा कॅबिनचा वापर कायमस्वरूपी आरोग्य सुविधांसाठी करण्यात येणार आहे. आदिवासीबहुल भागांतील गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे म्हणून, तर शहरातील झोपडपट्ट्या आणि आरोग्य सुविधांची कमतरता असलेल्या परिसरांत आरोग्य केंद्रे म्हणून या कॅबिनचा उपयोग केला जाणार आहे.
त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कुंभपर्वानंतरही ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे.






