Ramayana: रामायणाच्या दुसऱ्या भागाआधी संत-अभ्यासकांना चित्रपट दाखवा; हिंदू संघटनांची मागणी
रामायण चित्रपटातील काही दृश्यांमधून मूळ रामायणाच्या कथेत बदल करण्यात आल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. रावणाचे महिमामंडन आणि प्रभू श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांच्या व्यक्तिरेखांचे चुकीचे चित्रण केल्याचा दावा करण्यात आला आहे.
November 17, 2026 07:12 PM
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी रामायण चित्रपटासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. चित्रपटातील काही दृश्यांमधून रामायणातील मूळ कथेत जाणीवपूर्वक बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.रामाऐवजी रावणाचे महिमामंडन होणार असेल तसेच आमच्या धर्मग्रंथांतील संदर्भांची मोडतोड होणार असेल तर आम्ही या चित्रपटाच्या येणाऱ्या दुसऱ्या भागाला कडाडून विरोध करू, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले की, जे रामायणात आहे, तसेच चित्रण होणे अभिप्रेत आहे. मात्र अनेक प्रसंगांत मूळ रामायणातील प्रसंगांची मोडतोड केली आहे. हे स्वीकारार्ह नाही. आज देशात रामभक्त पंतप्रधान आणि रामाला आदर्श मानणारे सरकार असताना अशा कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड होत असेल, तर ते दुर्दैवी आहे.
या चित्रपटातील हिंदू जनजागृती समितीचे प्रमुख आक्षेप पुढीलप्रमाणे :-
1. प्रत्यक्षात ऋषिमुनींचे आश्रम नष्ट करणाऱ्या पापी रावणाला या चित्रपटात गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार म्हणून रंगवले आहे.
2. माता सीतेचे हरण करणारा, अनेक महिलांवर अत्याचार केल्याने ‘परस्त्रीला स्पर्श केल्यास भस्म होण्याचा शाप मिळालेला’ रावणाला एका दासीला छेडल्यामुळे शूर्पणखेचा पती विद्युतजिव्हाला मारत ‘महिलांच्या सन्मानाचा रक्षक’ दाखवण्यात आले आहे.
3. चित्रपटात शूर्पणखेला ती रामाकडे केवळ ‘लग्नाचा प्रस्ताव’ घेऊन आली होती आणि केवळ त्यावरून लक्ष्मणाने तिचे नाक कापले, असे दाखवले आहे. तसेच या प्रसंगाबद्दल प्रभू श्रीराम लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्याच्या कृतीबद्दल खर-दूषण या राक्षसांकडे क्षमायाचना करताना दाखवले आहेत. हे अत्यंत आक्षेपार्ह आहेत.
4. खर-दूषण आणि त्यांचे १४ हजार राक्षस, तसेच ताडका यांच्याशी युद्ध करताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांच्या सैन्यापासून पळताना दाखवले आहेत. वस्तुत: विष्णूचा अवतार असलेले भगवान श्रीराम आणि लक्ष्मण हे अजेय योद्धे होते, त्यांनी रणांगणातून कधीही पळ काढणे तर दूर माघारही घेतलेली नाही.
मुंबई : दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, ...
5. चित्रपटात लक्ष्मणाला सतत उद्धट, संतापी आणि वर्तमानातील एखाद्या ‘कॉमेडी’ पात्राप्रमाणे संवाद करतांना दाखवले आहे. अत्यंत नम्र आणि निष्ठावान असलेल्या लक्ष्मणाला श्रीराम, भगवान परशुराम आणि अन्य पूजनीय ऋषींशी उपरोधिक भाषेत बोलताना दाखवले आहे.
6. या चित्रपटात माता सीता इतर राक्षसांशी स्वतः लढताना दाखवली आहे; पण रावण जेव्हा तिचे अपहरण करतो तेव्हा ती कोणताच प्रतिकार करत नाही, हा मोठा विरोधाभास आहे. माता सीता युद्ध करते, असे वाल्मिकी रामायणात कुठेही उल्लेख नाहीत.
7. मूळ रामायणानुसार सीता-स्वयंवरामध्ये रावणही होता आणि त्याला शिवधनुष्य उचलता आले नाही, त्यामुळे तो खजिल झाला होता. ही वस्तुस्थिती असताना चित्रपटात रावणाला या प्रसंगात दाखवलेलेच नाही.
या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांच्या संदर्भात आम्ही निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांना सांगू इच्छितो की, या चित्रपटाप्रमाणेच त्याच्या दुसऱ्या भागातही मोडतोड झालेली आढळली, तर देशभरात रस्त्यावर उतरून या चित्रपटाला आम्ही कडाडून विरोध करू. दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी यांनी हिंदु संत आणि रामायणाचे अभ्यासक असलेल्यांना चित्रपट दाखवून प्रदर्शित करावा, असेही आवाहन हिंदु संघटनांच्या वतीने करत असल्याचे अभय वर्तक यांनी या वेळी सांगितले. तसेच रामभक्त सरकारनेही रामाची निंदा करणाऱ्या चित्रपटाविषयी भूमिका घ्यावी, असे आवाहनही सरकारला केले आहे.