Wednesday, November 18, 2026

कुटुंबीयांना सोडायला गेले अन् 36,000 चा फटका बसला, नातेवाईकांना दंड का भरावा लागला?

उत्तर प्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकावर पाहुण्यांना वंदे भारत ट्रेनमध्ये बसवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 12 जणांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ट्रेनचे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) दरवाजे बंद झाल्यामुळे हे सर्वजण ट्रेनमध्येच अडकले आणि त्यांना विनायोजना तब्बल 139 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. अखेर विना तिकीट आढळल्याने रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून हजारोंचा दंड वसूल केला.

मुंबई: भारतीय रेल्वेचे नियम किती कडक आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रवाशांना कसा नाहक भुर्दंड बसू शकतो, याचे एक रंजक आणि थक्क करणारे उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपुर रेल्वे स्थानकावर आले आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवास करण्यासाठी भारतीय प्रवाशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं कानपूरमध्ये?

रविवारी सकाळी वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22415) कानपूर रेल्वे स्थानकावर थांबली होती. घरी आलेल्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना डब्यात बसवून निरोप देण्यासाठी एकाच कुटुंबातील तब्बल 12 जण ट्रेनमध्ये चढले. त्यांना वाटले की नेहमीच्या साध्या गाड्यांप्रमाणे आपण पाहुण्यांना सोडून सहज खाली उतरू शकू. मात्र, ही हायटेक वंदे भारत एक्सप्रेस होती. सकाळी 09.30 वाजता ट्रेन सुटण्याची वेळ होताच या ट्रेनचे ऑटोमॅटिक (स्वयंचलित) दरवाजे आपोआप बंद झाले. दरवाजे बंद झाल्यानंतर हे सर्वजण हातापाय मारू लागले आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु, हायटेक मेकॅनिझममुळे दरवाजे उघडणे शक्य झाले नाही आणि काही सेकंदांतच ट्रेनने वेग पकडला.

139 किलोमीटरचा विनातिकिट प्रवास

आपल्या नातेवाईकांना डब्ब्यामध्ये बसवून देण्यासाठी 12 जण ट्रेनमध्ये चढले. पण त्यांना सोडायला येण्याच्या नादामध्ये त्या 12 जणांनी आपल्या नातेवाईकांसोबत तब्बल 139 किमीचा प्रवास केला. अचानक ट्रेनचे दरवाजे बंद झाल्यामुळे त्यांना नाईलाजाने इतका लांबचा प्रवास करावा लागला. डब्यात अचानक झालेल्या या गोंधळामुळे इतर प्रवासीही चक्रावून गेले. अखेर ट्रेनमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने कंट्रोल रूमशी संपर्क साधला. त्यानंतर कानपूरपासून तब्बल 79 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या इटावा जंक्शन येथे या हायटेक ट्रेनचा एक विना-नियोजित (Unscheduled) थांबा घेण्यात आला आणि त्या स्थानकावर सर्व नातेवाईकांना खाली उतरवण्यात आले.

36 हजार रुपयांचा दंड

इटावा स्थानकावर उतरवल्यानंतर या सर्व 12 जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) चौकीत नेण्यात आले. तिथे रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांची कसून तपासणी केली, तेव्हा त्यांच्याकडे प्रवासाचे वैध तिकीट दूरच, पण साधे प्लॅटफॉर्म तिकीटही नसल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीकडून 3000 रुपये प्रमाणे एकूण 12 जणांकडून तब्बल 36,000 रुपयांचा दंड वसूल केला. केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे आणि रेल्वेच्या हायटेक नियमांची माहिती नसल्यामुळे या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >