डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज जगातील बहुतांश कामे काही क्षणांत पूर्ण होत आहेत. बँकिंग व्यवहारांपासून ते विमानसेवा, ई-मेल आणि कार्यालयीन कामांपर्यंत सर्वच गोष्टी इंटरनेटवर अवलंबून आहेत. मात्र, याच तंत्रज्ञानातील तांत्रिक बिघाड आता मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांत जगातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या सेवा विस्कळीत झाल्याने डिजिटल व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, AI चा वाढता वापर सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान उभे करत आहे.
मायक्रोसॉफ्टपासून अॅपलपर्यंत अनेक सेवांना फटका
गेल्या १५ दिवसांत अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले. मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील युजर्सना ई-मेल आणि ऑफिसशी संबंधित कामे करण्यात अडचणी आल्या. आउटलुक, टीम्स आणि AI असिस्टंट कोपायलट यांसारख्या सेवाही काही काळ प्रभावित झाल्या. कंपनीच्या माहितीनुसार, सर्व्हर अपग्रेडदरम्यान नेटवर्कमधील जुन्या तांत्रिक त्रुटीमुळे ही समस्या निर्माण झाली होती.
विमानसेवा आणि बँकिंग व्यवहारही विस्कळीत
तांत्रिक बिघाडाचा फटका केवळ इंटरनेट सेवांनाच नाही, तर विमान वाहतूक आणि बँकिंग क्षेत्रालाही बसला. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात FAA च्या नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने देशभरातील विमान उड्डाणांवर चार तासांहून अधिक काळ निर्बंध घालावे लागले. याला गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक काळ चाललेला राष्ट्रीय स्तरावरील ग्राउंड स्टॉप असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर युनायटेड एअरलाइन्सच्या यंत्रणेतही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने अनेक उड्डाणे प्रभावित झाली. दरम्यान, जेपी मॉर्गन चेस बँकेच्या ग्राहकांनाही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. बँकेच्या अंतर्गत हार्डवेअर सिस्टीममधील सॉफ्टवेअर बगमुळे आर्थिक व्यवहारांना विलंब झाला. तर अॅपल म्युझिक, अॅप स्टोअर आणि अॅपल केअर यांसारख्या सेवांवरही तांत्रिक बिघाडाचा परिणाम दिसून आला.
AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."
AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने अँथ्रोपिकच्या Claude AI ला १ ते १ लाख पर्यंत मोजायला ...
AI मुळे सायबर सुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर ?
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या वापराबाबतही चर्चा सुरू झाली आहे. AI मुळे सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधणे सोपे होत असले, तरी याच तंत्रज्ञानाचा वापर सायबर हल्ले अधिक प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अलीकडेच AI च्या मदतीने PHP प्रोग्रामिंग भाषेतील अनेक सुरक्षा त्रुटी शोधण्यात आल्या. त्यानंतर संबंधित कंपन्यांना आवश्यक सुरक्षा अपडेट जारी करावे लागले. त्याचप्रमाणे सायबर सुरक्षा क्षेत्रातील स्टार्टअप Calif ने AI च्या मदतीने Java मधील एका सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधली. यानंतर Oracle ने सुरक्षा अपडेट जारी केले. तसेच अमेरिकेतील सायबर सुरक्षा यंत्रणांनी संबंधित संस्थांना हे अपडेट इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला. न्यूयॉर्क विद्यापीठातील सायबर सुरक्षा तज्ज्ञ जस्टिन कॅप्पोस यांच्या मते, AI मुळे सायबर हल्ले करणे हल्लेखोरांसाठी अधिक सोपे होत आहे. मात्र, सॉफ्टवेअरमधील त्रुटी दुरुस्त करण्याच्या बाबतीत AI अजूनही तितके प्रभावी ठरलेले नाही.
भविष्यात तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढणार ?
तज्ज्ञांच्या मते, AI चा वापर वाढत असताना अशा तांत्रिक समस्यांची शक्यताही वाढू शकते. कारण आजच्या अनेक डिजिटल यंत्रणा मोठ्या प्रमाणावरील AI सेवांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना जुन्या डिजिटल पायाभूत सुविधांवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व घटनांमध्ये सायबर हल्ला झाला आहे किंवा या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे, याचा पुरावा नसल्याचे अमेरिकन सरकार आणि संबंधित कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकन सिनेटर मार्क वॉर्नर यांनीही या घटनांकडे इशारा म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. AI ज्या वेगाने विकसित होत आहे, त्या तुलनेत त्याच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्याची तयारी अजूनही मागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकूणच, डिजिटल तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व आणि AI चा वेगाने होणारा विस्तार पाहता भविष्यात सायबर सुरक्षा आणि डिजिटल यंत्रणांची विश्वासार्हता हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे केवळ नवे तंत्रज्ञान विकसित करणेच नव्हे, तर त्यातील त्रुटी वेळेत शोधून त्या दुरुस्त करण्याची यंत्रणाही अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.