
नाशिक : नाशिकच्या प्रसिद्ध सायंतारा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया आणि कच्च्या मालाची साठवणूक अस्वच्छ परिस्थितीत होत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे सायंताराच्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खाद्यपदार्थ, कच्च्या मालाची साठवणूक अस्वच्छ पद्धतीने
अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने सहाय्यक आयुक्त विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी केली. यावेळी आस्थापनामध्ये खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक परिस्थितीत सुरू असल्याचे आढळले. तसेच खाद्यपदार्थ आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची साठवणूकही अस्वच्छ पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास आले.
अशा अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेले किंवा साठवलेले खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संबंधित खाद्य व्यवसायाचे एफएसएसएआय (FSSAI) नोंदणी प्रमाणपत्र तातडीने निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी ही कारवाई केली.
मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील गाजलेल्या व शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या आरोपावरून मालेगाव येथील प्रसिद्ध ...
अन्न व्यावसायिकांना प्रशासनाचा इशारा
अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे, कच्च्या मालाची आणि तयार पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक करणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
एखाद्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्ता किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या "complaints.mahafda.in" (http://complaints.mahafda.in/) या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी प्राप्त केल्यानंतरच खाद्य व्यवसाय करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






