Thursday, November 19, 2026

IND vs NZ 1st Test: पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला बसवण्याचा निर्णय योग्यच! प्रशिक्षकांनी दिलं असं कारण

भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. पण या सामन्यात मोहम्मद सिराज प्लेइंग 11 चा भाग नाही. त्यामुळे बराच गदारोळ सुरू आहे. सुनील गावस्कर यांनी या निर्णयावर टीका केली तर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पकड मिळवली. पण त्यानंतर ही पकड सैल झाली आणि न्यूझीलंडने कमबॅक केलं. असं असताना भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोहम्मद सिराज नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर क्रिकेट जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सुनील गावस्कर, अजय जडेजा, अजिंक्य रहाणे यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं जाहीरपणे सांगितलं. सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, सिराजचा शेवटचा एकदिवसीय सामना पाहता त्याला पहिल्या कसोटीत संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्याला संघातून वगळणे आश्चर्यकारक होते. या गदारोळात टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिलं आहे. मोहम्मद सिराजला वगळणं हा चुकीचा निर्णय नाही, असं स्पष्टीकरण फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी दिलं आहे.

आम्ही सर्वोत्कृष्ट प्लेइंग 11 निवडली

सितांशु कोटक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, वेलिंग्टन कसोटीतील परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय संघाने सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली आहे. सितांशु कोटक म्हणाले की, 'कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला वाटते की, परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी संघ लक्षात घेता हाच सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ आहे. वैयक्तिकरित्या मला वाटते की, सिराजला संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा नव्हता.' प्रसिद्ध कृष्णाच्या निवडीबाबत सितांशु कोटक म्हणाले की, 'कृष्णा एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध धावा केल्या जाऊ शकतात. जेव्हा तो विकेट घेतो तेव्हा तो लोकांना आवडतो, पण जेव्हा तो धावा देतो तेव्हा ते नाराज होतात. आम्ही वेलिंग्टन कसोटीसाठी दोन स्विंग गोलंदाज आणि दोन सीम गोलंदाज निवडले. आम्ही प्रत्येक दिवसासाठी संघ निवडला.'

भारताचे प्लेइंग 11: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर

वेलिंग्टन कसोटी सामन्याचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला. खरं तर न्यूझीलंडने 70 धावांवर पाच विकेट गमावले होते. त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 173 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडे पहिल्या दिवसअखेर 5 गडी गमवून 243 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3, तर अंशुल कंबोज आणि आकाश दीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >