
Technology News: Instagram वापरणाऱ्यांसाठी एक नवे फीचर आणण्यात आले आहे. अनेकदा घाईत स्टोरी पोस्ट केल्यानंतर त्यातील स्पेलिंगची चूक, मजकूर किंवा स्टिकर बदलण्याची गरज भासते. यापूर्वी अशा चुका सुधारण्यासाठी संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा अपलोड करावी लागत होती. त्यामुळे आधी मिळालेले व्ह्यूज आणि रिप्लायही गमवावे लागत होते. मात्र, आता Instagram च्या नव्या फीचरमुळे स्टोरी डिलीट न करताही त्यात बदल करता येणार आहेत. ( Instagram Story)
पोस्ट केल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत एडिट करता येणार
Instagram च्या नव्या अपडेटनुसार, स्टोरी पोस्ट केल्यानंतर सुरुवातीच्या 15 मिनिटांपर्यंत त्यात बदल करण्याची सुविधा मिळणार आहे. या कालावधीत युजर्स मजकूर, म्युझिक, स्टिकर्स आणि ड्रॉइंगमध्ये आवश्यक ते बदल करू शकतील.
Instagram चे प्रमुख Adam Mosseri यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली. युजर्सकडून बऱ्याच काळापासून अशा सुविधेची मागणी केली जात होती. त्यामुळे स्टोरी पोस्ट केल्यानंतर लक्षात आलेल्या छोट्या चुका सुधारण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.
असे वापरा नवीन Edit Story फीचर
हे फीचर वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम Instagram वर आपली पोस्ट केलेली स्टोरी उघडा.
- स्क्रीनच्या खालच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सच्या मेन्यूवर टॅप करा.
- त्यामधील 'Edit Story' हा पर्याय निवडा.
- त्यानंतर मजकूर, म्युझिक, स्टिकर्स किंवा ड्रॉइंगमध्ये आवश्यक बदल करा.
- बदल पूर्ण झाल्यानंतर स्टोरी अपडेट करा.
लक्षात ठेवा, ही सुविधा स्टोरी पोस्ट केल्यानंतर केवळ सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी उपलब्ध असेल. एडिट केलेल्या स्टोरीवर 'Edited' असे लेबलही दिसेल.
स्टोरी तयार करण्याच्या प्रक्रियेतही बदल
Instagram ने स्टोरी एडिट करण्याच्या सुविधेसोबत स्टोरी तयार करण्याच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. आता स्टिकर्ससाठी नवीन फॉन्ट, रंग आणि आकारांचे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. स्टिकर्स वेगवेगळ्या शीटमध्ये दाखवले जाणार असल्याने आवडता पर्याय शोधणे सोपे होईल.
याशिवाय, एकाच वेळी अनेक फोटो निवडण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात येत आहेत. स्टोरी तयार करताना नवीन ब्लर इफेक्ट्स, रंग आणि ग्रेडिएंट बॅकग्राउंडचे पर्यायही मिळणार आहेत. या बदलांमुळे युजर्सना आपल्या आवडीनुसार स्टोरी अधिक आकर्षक बनवता येणार आहे.






