
पंढरपूर : कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिका सज्ज झाली आहे. यात्रेच्या व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, दर्शन रांग आणि निवास व्यवस्थेसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये मोटारसायकलवरून फेरफटका मारत विविध व्यवस्थांची पाहणी केली. त्यानंतर चंद्रभागेच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारून घाट परिसरातील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वारकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध ठिकाणी वॉटर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात आली आहे. आरोग्य शिबिरे उभारण्यात आली असून, रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही शिंदे यांनी पाहणी केली.
स्वच्छतेच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून 4 ते 5 वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. चंद्रभागा परिसरात चेंजिंग रूम, शौचालये, स्नानगृहे आणि घाटांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नव्याने विकसित केलेल्या घाटांमुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे परिसरातील सुमारे 65 एकर जागेचाही यात्रेच्या नियोजनासाठी उपयोग करण्यात येणार आहे.
दर्शन रांगेत वारकऱ्यांना तासन्तास उभे राहावे लागू नये, यासाठी पंखे, कुलर आणि बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणत्याही भाविकाची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : एलपीजी, प्रोपिलीन यांसारख्या ज्वलनशील पदार्थांची टँकरमधून ढाबे अथवा अनधिकृत गोदामांमध्ये होणारी उतराई आणि चोरी यामुळे मोठ्या दुर्घटनेचा ...
चंद्रभागेच्या घाटावर एकनाथ शिंदेंनी स्वतः केली स्वच्छता
पाहणीदरम्यान चंद्रभागेच्या तीरावर पायऱ्यांची पाइपद्वारे स्वच्छता सुरू असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांच्या हातातील पाइप घेत पायऱ्यांची स्वच्छता केली. त्यानंतर बोटीतून चंद्रभागेच्या पात्रात फेरफटका मारत घाट परिसरातील सुविधांची पाहणी केली. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून यंदा विशेष तयारी करण्यात आली आहे.





