गेमप्रेमींसाठी गेल्या 13 वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गुरुवारी मध्यरात्री बहुप्रतिक्षित 'ग्रँड थेफ्ट ऑटो 6' म्हणजेच GTA 6 लाँच झाला. जगभरातील लाखो गेमर्सनी रात्रभर जागून हा गेम खेळायला सुरुवात केली. मात्र याच गेमच्या क्रेझचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GTA 5 ते GTA 6 या 13 वर्षांच्या काळात भारताने केलेल्या प्रगतीचा हिशेब मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत 2013 पासून ते आतापर्यंत भारतात काय बदल झाले, याची यादी दिली आहे. GTA 5 सप्टेंबर 2013 मध्ये आला होता. त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. तेव्हापासून भारताने अनेक क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मोदींनी काय सांगितलं?
भारत 'फ्रॅजाईल फाईव्ह' अर्थव्यवस्थेतून बाहेर पडून आता जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. गरिबी कमी झाली, आर्थिक समावेश वाढला. यूपीआयमुळे डिजिटल पेमेंटमध्ये भारताने जगात आघाडी घेतली. स्वच्छता अभियान यशस्वी झालं. इंटरनेट स्वस्त झालं आणि तंत्रज्ञानात भारताची क्षमता वाढली. अवकाश क्षेत्रातही भारताने मोठी कामगिरी केली. तसेच नक्षलवादमुक्त भारताकडे वाटचाल सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. गेमर्सनी 13 वर्षं व्हाईस सिटीमध्ये परतण्यासाठी वाट पाहिली, तर याच काळात भारताने प्रत्येक क्षेत्रात लेव्हल अप केल्याचं मोदींनी या पोस्टमधून दाखवलं.
GTA 6 मध्ये काय आहे खास?
रॉकस्टार गेम्सने तयार केलेला GTA 6 खेळाडूंना लिओनिडा या काल्पनिक राज्यात घेऊन जातो. हे राज्य फ्लोरिडावरून प्रेरित असून व्हाईस सिटी हे त्याचं मुख्य शहर आहे. यात लुसिया कॅमिनोस आणि जेसन डुव्हल हे दोन मुख्य पात्र आहेत. दोघेही गुन्हेगारीत भागीदार आहेत. या गेमची क्रेझ किती आहे, हे त्याच्या प्री-ऑर्डरवरून समजतं. प्री-ऑर्डरने तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याचा अंदाज आहे. लाँच होण्याच्या नऊ दिवस आधीच या गेमने 1 अब्ज डॉलर्सची प्री-ऑर्डर कमाई केली होती. हा आकडा कॉल ऑफ ड्युटीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. जगभरात हा गेम मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या लाँचपैकी एक ठरणार आहे. अनेकांनी सुट्टी घेऊन, झोप मोडून हा गेम खेळायला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे रिव्ह्यूही जबरदस्त सकारात्मक आहेत. मेटाक्रिटिकवर या गेमला जवळपास परफेक्ट स्कोअर मिळाला आहे. 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या GTA 6 ने गेमिंग विश्वात नवा इतिहास रचला असून, त्याचवेळी भारताच्या प्रगतीची चर्चाही त्यामुळे रंगली आहे.