Friday, November 20, 2026

Nashik News : नाशिकच्या पक्षी मानचिन्ह निवडीत गिधाडाची बाजी

नाशिक शहराची पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख अधोरेखित करणाऱ्या एका अनोख्या उपक्रमात गिधाडाला पक्षी मानचिन्ह म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

नाशिक : नाशिक शहराच्या पक्षी मानचिन्ह निवडीचा निकाल महानगरपालिकेत जाहीर करण्यात आला. या निवड प्रक्रियेत गिधाडाने बाजी मारली असून, त्याला सर्वाधिक १ हजार ९९५ मते मिळाली आहेत. तर कावळ्याला १ हजार ३७ मते मिळाली. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते हा निकाल जाहीर करण्यात आला. News

‘आपलं पर्यावरण’ संस्थेच्या पुढाकारातून उपक्रम

नाशिकचे पक्षी मानचिन्ह निश्चित करण्यासाठी ‘आपलं पर्यावरण’ संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी कावळा आणि गिधाड हे दोन पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आले होते. पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबरपासून ऑनलाइन मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून किंवा ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या पक्ष्याला मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

पक्षी मानचिन्ह निवडीत गिधाडाची बाजी

या अनोख्या पक्षी निवडणुकीत एकूण ३ हजार ३२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी गिधाडाला १ हजार ९९५ मते, तर कावळ्याला १ हजार ३७ मते मिळाली. तब्बल ९५८ मतांच्या फरकाने गिधाडाने कावळ्यावर विजय मिळविला. एकूण मतदानापैकी गिधाडाला सुमारे ६५.८ टक्के, तर कावळ्याला ३४.२ टक्के मते मिळाली. त्यामुळे नाशिकच्या पक्षी मानचिन्हासाठी गिधाडाला नागरिकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.या प्रक्रियेत गिधाडाने आघाडी घेतल्याने नाशिकच्या पक्षी मानचिन्हासाठी त्याची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पक्षी संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज

दरम्यान, पक्षी मानचिन्ह निवडण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष पक्षी संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. गिधाड आणि कावळ्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, देशी वृक्षांचे संवर्धन, सुरक्षित अन्नसाखळी निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे, या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. महापालिका, वन विभाग, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे संवर्धनाचा कृती आराखडा राबवावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकमध्ये निसर्ग संवर्धनाची व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला.

पक्षी व जैवविविधता संवर्धनाच्या नव्या पर्वाची सुरुवात

'मानचिन्ह निवड हा उपक्रमाचा शेवट नसून पक्षी व जैवविविधता संवर्धनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. गिधाड आणि कावळ्यांचे अधिवास जपण्यासाठी डोंगरकडे, जुने देशी वृक्ष आणि शास्त्रीय कचरा व्यवस्थापनावर प्रत्यक्ष काम होणे आवश्यक आहे. त्यातूनच हरित नाशिक आणि हरित कुंभमेळ्याचे स्वप्न साकार होईल,' असे मत शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. या निकालाच्या घोषणाप्रसंगी 'आपलं पर्यावरण संस्था'चे शेखर गायकवाड यांच्यासह गिधाड संवर्धनासाठी कार्य करणारे शंकर बाबा शिंदे, यशवंत किसन निंबारे, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, सह्याद्री देवराई, ईशा फाउंडेशन, ग्रीन रिव्होल्युशन यांसह विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि वन्यजीव अभ्यासक उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >