
मुंबई : राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना आता ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात मंजुरी दिली असून, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.
चारही कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना लाभ
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनाही शैक्षणिक शुल्क आणि विविध महाविद्यालयीन शुल्कांमध्ये सवलत दिली जाणार आहे.
याबाबत कृषी विभागाने 20 नोव्हेंबर 2026 रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या निकषांनुसारच विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळेल.
कोणत्या शुल्कांमध्ये मिळणार सवलत?
या निर्णयानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासह प्रवेश शुल्क, ग्रंथालय शुल्क, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क आणि विद्यार्थी सहाय्य व कल्याण निधीमध्ये सवलत मिळणार आहे. याशिवाय विमा निधी, महाविद्यालयीन मासिक शुल्क, वैद्यकीय मदत निधी आणि विद्यार्थी ओळखपत्र शुल्काचाही यात समावेश आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबणार नाही
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, हा सरकारचा उद्देश असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. या निर्णयामुळे मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांना पात्रतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना आवश्यक समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.






