Friday, November 20, 2026

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना कोणताही अभ्यास किंवा संशोधन न करता याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने फटकारले. त्यामुळे पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्द्यांवर यापूर्वीही न्यायालयाने निर्णय दिलेला असताना त्याच स्वरूपाची याचिका पुन्हा का दाखल करण्यात आली, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला. तसेच कोणतेही संशोधन आणि पुरेशी माहिती न घेता याचिका दाखल केल्याबद्दल ताशेरेही ओढले.(Parth Pawar)

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. पुणे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आणि राजकीय वरदहस्तामुळे पोलीस पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. अमेडिया इंटरप्राइझेस या कंपनीत पार्थ पवार यांचा जवळपास 99 टक्के हिस्सा असून, कंपनीतील उर्वरित एक टक्का हिस्सेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई झाली नाही, असा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला होता.(Bombay High Court)

या याचिकेवर सुनावणीदरम्यान राज्य सरकारने याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची भूमिका न्यायालयात मांडली. यापूर्वी अशाच स्वरूपाची याचिका फेटाळण्यात आली असताना त्याच मुद्द्यांच्या आधारे पुन्हा याचिका दाखल करण्याच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळून लावली.(Maharashtra Politics)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >