Friday, November 20, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 डिसेंबरचा बारामती दौरा रद्द

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या 'प्रेरणास्थळा'च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित असलेला बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नव्या तारखेकडे लक्ष लागले होते. मात्र, पंतप्रधानांचा बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 12 डिसेंबरला स्वतः शरद पवार या प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर दौऱ्याची नवी तारीख शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासंदर्भात शरद पवार यांनी बैठकही बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधानांचा दौरा तूर्तास रद्द झाल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार हे येत्या १२ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याच दिवशी त्यांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात उपस्थित होते. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार गोविंदबाग या निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार यांची बैठक सुरू होती.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मोदी बारामतीत येणार असल्याने या दौऱ्याच्या राजकीय अर्थाबाबतही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता दौरा रद्द झाल्याचे शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >