
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयनासाठी हा निधी खर्च केला जाणार असून, धावपट्टीसह सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
बारामती विमानतळाच्या विकासाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या शक्तिप्रदत्त समितीसमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर विमानतळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला. यापैकी ६४ कोटी रुपये विमानतळाचे संचालन, विकास आणि पायाभूत सुविधांसाठी, तर ६८ कोटी रुपये विमानतळ चालविण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. धावपट्टीच्या कामांसह सुरक्षा विभागाचे आधुनिकीकरण, अग्निशमन व्यवस्थेसाठी क्रॅश फोमची सुविधा आणि सुरक्षा भिंतीची उभारणी या कामांचा त्यात समावेश आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.
मुंबई: भारत देश वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची तयारी वेगाने सुरू करत आहे. 2027 मध्ये मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड रेल कॉरिडोरचा टप्पा सुरू होण्याची ...
बारामती विमानतळाची उभारणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १९९६ मध्ये केली होती. बारामती शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेले हे प्रादेशिक विमानतळ खासगी विमानांच्या उड्डाणांसाठी तसेच वैमानिक प्रशिक्षणासाठी वापरले जाते. विमानतळाची धावपट्टी ५ हजार ५०० फूट लांब आणि १०० फूट रुंद आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी हे विमानतळ एमआयडीसीकडून हस्तांतरित करण्यात आले होते.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीला आलेले व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट ४५ विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर विमानतळावरील पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा चर्चेत आला होता.





