Thursday, November 19, 2026

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

भारत आणि मलेशिया यांच्यातील ‘हरिमौ शक्ती-6’ या संयुक्त लष्करी सरावाची सहावी आवृत्ती मलेशियातील इपोह येथे सुरू झाली आहे. 19 ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान चालणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी 120 जवान सहभागी झाले असून, दहशतवादविरोधी कारवाया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे.

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त लष्करी सराव मलेशियातील इपोह येथे सुरू झाला आहे. या सरावाची ही 6 वी आवृत्ती असून, 19 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उभय देशांच्या सैन्यांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी 120 जवानांचा समावेश आहे. ‘हरिमौ शक्ती’ हा सराव भारत आणि मलेशियामध्ये आलटून पालटून पार पडणारा महत्त्वाचा लष्करी उपक्रम मानला जातो.

संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या प्रकरण 7 अंतर्गत अप्रचलित (छुप्या) कारवायांचे संयुक्तपणे संचालन करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये समन्वय कसा साधायचा, यावर यामध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वनक्षेत्र आणि निम-शहरी प्रदेशांमधील समन्वित कारवायांवर हा सराव भर देईल. परिचालन परिणामकारकता आणि आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी संयुक्त नियोजन, रणनैतिक समन्वय तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे.

हा सराव टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असून, सुरुवातीला आंतर-प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यपद्धतींशी परिचय करून दिला जाईल. त्यानंतर संयुक्त सामरिक कवायती होतील. प्रशिक्षण उपक्रमांमध्ये संयुक्त कमांड पोस्ट आणि निगराणी केंद्राची स्थापना, दहशतवादविरोधी कारवाया, छापे टाकणे, वेढा घालून शोधमोहीम राबवणे तसेच लढाऊ अभियांत्रिकी कवायतींचा समावेश असेल. टेहळणी आणि निगराणीसाठी मानवरहित हवाई प्रणालीच्या एकात्मिक वापरावर, तसेच शत्रूचे ड्रोन शोधून त्यांना निष्प्रभ करण्यासाठी मानवरहित-प्रति हवाई प्रणालीच्या क्षमतेवर विशेष भर देण्यात येणार आहे.

दहशतवादविरोधी परिस्थितीचा काल्पनिक प्रसंग उभा करून त्यात समन्वित जमिनीवरील कारवाया, एकात्मिक निगराणी आणि मानवरहित प्रणालींचा वापर समाविष्ट करत, एका संयुक्त पडताळणी सरावाने या मोहिमेची सांगता होईल. या सरावामुळे दोन्ही देशांना डावपेच, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल.

‘हरिमौ शक्ती’ सरावामुळे दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य अधिक दृढ होईल. या उपक्रमामुळे भारत आणि मलेशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य व द्विपक्षीय लष्करी संबंधांना नवी गती मिळेल, तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >