Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे ४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, या संपूर्ण यंत्रणेचे तांत्रिक मूल्यांकन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्त आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शनिवारी (दि. २१) बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत सीसीटीव्ही यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्कच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
सीसीटीव्ही आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीची तपासणी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, ओएफसी नेटवर्क आणि बॅकहॉल कनेक्टिव्हिटीची कामे हाती घेण्यात आली आहेत. कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले ओएफसी मार्ग, नेटवर्कची क्षमता, कनेक्टिव्हिटी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ठिकाणे, त्यांची कार्यस्थिती आणि नियंत्रण कक्षाशी असलेली जोडणी यांची पाहणी केली जाणार आहे. तसेच प्रमुख रस्ते, घाट, गर्दीची ठिकाणे, वाहतूक जंक्शन, पार्किंग क्षेत्रे आणि संवेदनशील भागांमध्ये आणखी कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे का, याचाही आढावा घेतला जाणार आहे.
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी मोठी तयारी ! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर
नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आतापासूनच ...
कमांड अँड कंट्रोल यंत्रणेशी जोडणार
कुंभमेळ्याच्या काळात सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी सर्व कॅमेरे कमांड अँड कंट्रोल यंत्रणेशी जोडण्याचे नियोजन आहे. यामुळे गर्दीवर लक्ष ठेवणे, वाहतुकीचे नियमन करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे. यासाठी ओएफसी रूट मॅप, नेटवर्क टोपोलॉजी, कॅमेऱ्यांची ठिकाणे आणि संबंधित पायाभूत सुविधांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अतिरिक्त बँडविड्थ, नेटवर्क उपकरणे आणि इतर तांत्रिक सुविधांची गरजही तपासली जाणार आहे.
स्मार्ट सिटी डेटा सेंटरमध्ये आधुनिक सुविधा
स्मार्ट सिटीच्या डेटा सेंटरमध्ये प्रायव्हेट ५जी, मॅनेज्ड वाय-फाय, पीटीटीएक्स, सीसीटीव्ही डेटा आणि इतर आयटी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक सर्व्हर रॅक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांची उपलब्धताही तपासली जाणार आहे. एकूणच, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नाशिक प्रशासनाकडून तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान शहरातील गर्दी, वाहतूक आणि सुरक्षेचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.