Friday, November 20, 2026

Nashik MHADA Lottery : नाशिकमध्ये 17 लाखांपासून हक्काचे घर ! म्हाडाची 111 घरे सोडतीशिवाय मिळणार

या घरांसाठी अर्ज करताना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर अर्ज शुल्क ७०८ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

नाशिक : स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या नाशिक मंडळाने सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी कोणतीही सोडत काढली जाणार नाही. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर या घरांची विक्री केली जाणार आहे. १७ लाखांपासून २१ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत एकूण १११ घरे खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

सोडतीची प्रतीक्षा संपली, थेट घर खरेदीची संधी

म्हाडाच्या नाशिक मंडळाला पाथर्डी शिवार, म्हसरूळ शिवार, चेहडी शिवार आणि दसक शिवार या भागांमध्ये २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे उपलब्ध झाली होती. यापूर्वी या घरांची विक्री सोडतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र, दोनपेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही काही घरे विक्रीविना रिक्त राहिली. त्यामुळे आता या शिल्लक घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून १११ घरांच्या विक्री प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एखाद्या घरासाठी सर्वात आधी अर्ज करून आवश्यक अनामत रक्कम भरणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित केले जाणार आहे.

अर्ज कसा करायचा ? पात्रता काय ?

१९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या एक टक्का रक्कम भरणे अर्जदारासाठी बंधनकारक असणार आहे. ही घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असल्याने ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांनाच या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. त्याचबरोबर उपलब्ध घरांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेचे तपशीलही या संकेतस्थळावर मिळणार आहेत.

अधिकृत संकेतस्थळ : https://bookmyhome.mhada.gov.in

कोणत्या परिसरात किती घरे ? किंमत किती ?

म्हाडाच्या नाशिक मंडळाने चार वेगवेगळ्या परिसरांमध्ये ही १११ घरे उपलब्ध करून दिली आहेत.

पाथर्डी गाव - ४८ घरे : लाईफ ३६० प्रकल्पातील या घरांचे क्षेत्रफळ ४२.७० ते ४६.०२ चौरस मीटर आहे. घरांची किंमत १९ लाख २८ हजार ३३२ रुपयांपासून २० लाख ३६ हजार ६४४ रुपयांपर्यंत आहे.

म्हसरूळ गाव - ३० घरे : येथील घरांचे क्षेत्रफळ ३९.५९ चौरस मीटर असून प्रत्येक घराची किंमत १६ लाख ८९ हजार १५६ रुपये आहे.

चेहडी - १० घरे : साई सृष्टी प्रकल्पातील या घरांचे क्षेत्रफळ ४५.०६ चौरस मीटर आहे. प्रत्येक घराची किंमत २१ लाख १६ हजार ६८६ रुपये आहे.

दसक शिवार - २३ घरे : येथील घरांचे क्षेत्रफळ ४३.८९ ते ६०.९७ चौरस मीटर असून घरांची किंमत १७ लाख ६९ हजार ३२३ ते १८ लाख ४४ हजार ३४३ रुपये आहे.

अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क किती ?

या घरांसाठी अर्ज करताना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर अर्ज शुल्क ७०८ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. सोडतीची प्रतीक्षा न करता थेट अर्ज आणि अनामत रक्कम भरून घर मिळवण्याची ही संधी असल्याने इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध अटी व नियम तपासणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >