
नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांनी एसटी प्रवासाला दिलेल्या पसंतीमुळे विभागाने तब्बल २५ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
८०१ बस, २०० जादा फेऱ्या
दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागाने जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून जादा बसगाड्यांचे नियोजन केले होते. विभागातील ८०१ बसगाड्यांच्या माध्यमातून २०० जादा फेऱ्या चालवण्यात आल्या. या कालावधीत एसटीने एकूण ४३.१५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी वाहतुकीतही १.०२ लाख किलोमीटरची वाढ झाली आहे.
नाशिक-पुणे मार्गावरील एसी बसला मोठी पसंती
दिवाळीच्या काळात नाशिक-पुणे मार्गावरील सर्व वातानुकूलित बसगाड्यांचे आरक्षण १०० टक्के झाले होते. याशिवाय धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख मार्गांवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सप्तशृंग गड आणि त्र्यंबकेश्वर या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते.
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या ...
महिलांसाठीही विशेष सुविधा
भाऊबीजेच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन महामंडळाने एनएमसीएस कार्डची अट शिथिल केली होती. त्यामुळे अनेक महिला प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता आला. दरम्यान, दिवाळी पाडव्यानंतर मुंबई नाका, मध्यवर्ती बसस्थानक आणि निमाणी बसस्थानक येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सुट्ट्या संपल्यानंतर नोकरी आणि शिक्षणासाठी मुंबई-पुण्यासह अन्य शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली होती.
गतवर्षीपेक्षा १.३५ कोटींचे अधिक उत्पन्न
दिवाळीच्या काळात ८०१ बसगाड्यांच्या माध्यमातून ४३.१५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नाशिक विभागाने २५.६७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी ही माहिती दिली. आगार व्यवस्थापक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे हा विक्रमी महसूल मिळवणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.





