Thursday, November 19, 2026

Nashik : नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात स्वतःवर झाडली गोळी

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. या प्रकारामुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हेमाडे हे सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. राहत्या घरातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, हेमाडे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी सुसाईड नोट किंवा अन्य काही पुरावे आढळले आहेत का, याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून तपास सुरू आहे. दरम्यान, एका निवृत्त परिवहन अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने नाशिकमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >