
नाशिक : सोशल मीडियावर आकर्षक ड्रेसची रील पाहून ऑनलाइन खरेदी करणे सिडको परिसरातील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ड्रेस ऑर्डर करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी तरुणीला विविध शुल्क भरण्यास सांगत तब्बल ९९ हजार ६०५ रुपयांची फसवणूक केली. पैसे भरूनही ड्रेस मिळाला नाही आणि उलट पैशांची मागणी सुरूच राहिल्याने तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुजा लक्ष्मण चौरे (वय २३, रा. सिडको) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. (Nashik Crime News)
नेमकं काय घडलं ?
काही दिवसांपूर्वी तनुजा सोशल मीडियावर रील्स पाहत असताना तिला 'fashionista_attic_lady' या इन्स्टाग्राम आयडीवर ड्रेसची जाहिरात दिसली. ड्रेस आवडल्याने तिने त्याचा स्क्रीनशॉट काढून संबंधित आयडीवर संदेश पाठवला आणि ड्रेसची ऑर्डर नोंदवली. यानंतर ड्रेसच्या प्रोसेसिंगसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून संशयितांनी तिच्याशी संपर्क साधला.
संशयितांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तनुजाने वेळोवेळी ऑनलाइन पैसे पाठवले. ७०१४१३९९९३ या मोबाइल क्रमांकावर तसेच ९८७५७९३२४९ आणि 'rajmeena01@airtel' या फोन-पे आयडीवर तिने एकूण ९९ हजार ६०५ रुपये वर्ग केले. मात्र, पैसे भरूनही ऑर्डर केलेला ड्रेस त्यांना मिळाला नाही. विशेष म्हणजे, ड्रेस पाठवण्याऐवजी संशयितांकडून वारंवार आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली. (Nashik Crime News)
नाशिक : नाशिकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ...
अंबड पोलिसांत गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अज्ञात इन्स्टाग्राम आयडीधारक, संबंधित मोबाइल क्रमांक आणि फोन-पे आयडीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरील जाहिराती पाहून ऑनलाइन खरेदी करताना विक्रेत्याची खातरजमा करावी आणि अनोळखी व्यक्तींना प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैसे पाठवताना सावधगिरी बाळगावी, हे या घटनेतून अधोरेखित होते.






