Saturday, November 21, 2026

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर चार दिवस वाहतुकीत बदल

नाशिक : नाशिकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर २४ ते २७ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुलावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक दररोज तीन ठरावीक वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम सुरू असताना पुलावरून वाहनांची ये-जा सुरू राहिल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात नाशिक शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे.

दररोज या वेळेत वाहतूक बंद

२४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी ५ ते ६, दुपारी १ ते २ आणि दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत नंदिनी नदी पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

कोणत्या मार्गावर असेल बंदी ?

त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणाऱ्या सर्व वाहनांना पिंपळगाव बहुला पुलाखालील नाका येथे प्रवेश बंद राहील. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांना पिंपळगाव बहुला बसस्थानक येथे प्रवेश बंद राहील.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहतूक : महिरावणी येथून वाहने गिरणारे मार्गे नाशिककडे वळविण्यात येतील.

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक : अमृत चौक येथून वाहने अशोकनगर, कार्बन नाका आणि बारदान फाटा मार्गे वळविण्यात येतील.

पुलावरील गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >