पुलवामामध्ये पोलिसांनी लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोणताही स्थानिक दहशतवादी सक्रिय राहिला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (२१ नोव्हेंबर) सांगितले. अमित शाह यांनी लतीफ याला या गटाचा शेवटचा सक्रिय काश्मिरी सदस्य म्हटले आणि खोऱ्यात अजूनही कार्यरत असलेले इतर दहशतवादी हे परदेशी नागरिक असल्याचे सांगितले. अरुणाचल प्रदेश येथील बांदरदेवी येथे राज्य पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करण्याच्या समारंभात अमित शाह यांनी ही टिप्पणी केली. आपल्या भाषणात, त्यांनी १९९० च्या दशकात काश्मीरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला आणि २०१९ मध्ये केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावरील चर्चेला पुन्हा उजाळा दिला.
'काश्मीरमधील पुलवामा येथे काश्मीर पोलिसांनी लष्कर ए तोयबाशी संबंधित शेवटच्या ज्ञात सक्रिय काश्मिरी दहशतवाद्याला चकमकीत ठार केले. त्यामुळे आज मी अभिमानाने सांगू शकतो की काश्मीर खोऱ्यात एकही स्थानिक दहशतवादी शिल्लक राहिलेला नाही. जे काही उरले आहेत, ते सर्व परदेशी दहशतवादी आहेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो आपल्या सुरक्षा दलांनी आणि गुप्तचर संस्थांनी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, त्यांच्या सातत्यपूर्ण शौर्याद्वारे, निष्ठेद्वारे आणि बलिदानाद्वारे गाठला आहे.' असे अमित शाह म्हणाले. शाह यांनी आठवण करून दिली की, १९९० च्या दशकात दहशतवादाच्या काळात, भारत काश्मीरवर ताबा ठेवू शकेल का, असा प्रश्न लोकांनी उघडपणे उपस्थित केला होता. फारुख अब्दुल्ला यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री इंग्लंडला निघून गेले होते. शाह यांनी त्या काळात खोऱ्यात कार्यरत असलेल्या सुरक्षा दलांना काश्मीरला देशाशी एकसंध ठेवण्याचे श्रेय दिले. 'मला या देशातील लोकांना १९९० च्या दशकातील काश्मीर खोर्ट्यातील परिस्थितीची आठवण करून द्यायची आहे, ज्या काळात आपण काश्मीरवर किती काळ ताबा ठेवू शकू, असा प्रश्न अनेकांना पडला होता,' असे ते म्हणाले.
''२०१९ मध्ये जेव्हा कलम ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येऊन विचारत होता की, 'कलम ३७० आणि दहशतवाद यांचा काय संबंध आहे?' आज, परशुरामाच्या या भूमीवर उभे राहून, मी संपूर्ण देशाला अभिमानाने सांगू शकतो की, कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मीरमधील तरुणांमधील फुटीरतावादी भावनेचा अंत झाला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, आज काश्मीर खोऱ्यात एकही काश्मिरी तरुण दहशतवादी नाही. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे." असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.