Sunday, November 22, 2026

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

नागरिक आपल्या स्मार्टफोनद्वारे हा QR कोड स्कॅन करून संबंधित व्यक्ती खरोखर पोलीस दलात कार्यरत आहे की नाही, याची खात्री करू शकतील. 

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आता QR कोड असलेली स्मार्ट ओळखपत्रे दिली जाणार आहेत. नागरिक आपल्या स्मार्टफोनद्वारे हा QR कोड स्कॅन करून संबंधित व्यक्ती खरोखर पोलीस दलात कार्यरत आहे की नाही, याची खात्री करू शकतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई पोलीस दलाच्या डिजिटल व्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी वाहतूक पोलिसांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

QR कोड स्कॅन करताच मिळणार अधिकाऱ्याची माहिती

नवीन स्मार्ट कार्डवर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र आणि स्वतंत्र QR कोड असेल. नागरिकांना मुंबई पोलीस सिटीझन ॲपच्या माध्यमातून हा कोड स्कॅन करता येईल. त्यानंतर अधिकृत पडताळणी प्लॅटफॉर्मवर संबंधित अधिकाऱ्याचे छायाचित्र, नाव, सेवेत रुजू झाल्याची तारीख आणि सध्याची नियुक्ती यांसारखी माहिती दिसेल.

नागरिक या माहितीची ओळखपत्रावरील तपशिलांशी तुलना करून संबंधित व्यक्तीची ओळख पडताळू शकतील. त्यामुळे पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि इतर नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांना आळा घालण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

NFC तंत्रज्ञानाचाही वापर

या स्मार्ट कार्डमध्ये नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे. अधिकृत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित पोलीस आस्थापनांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि इतर अधिकृत कामांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

51,308 पदांचा प्रकल्पात समावेश

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट कार्डच्या छपाईचे काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांना कार्ड वितरित करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पात मुंबई पोलीस दलातील 51,308 मंजूर पदांचा समावेश आहे. यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

विशेष म्हणजे, अधिकृत कामावर असताना गणवेशात किंवा साध्या वेशात असलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला हे स्मार्ट ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य असेल. त्यामुळे नागरिकांशी संपर्क साधणाऱ्या पोलिसांची ओळख पडताळणे अधिक सोपे होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >