
गेली काही वर्षे अभिनेता गौरव खन्नासाठी चढ उतारांनी भरलेली होती. एकीकडे 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' आणि 'बिग बॉस १९' सारखे शो जिंकून त्याने आपल्या व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळवले. दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आकांक्षा चामोलाने लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. त्यावेळी गौरवने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता तो आपल्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याच्या आगामी 'दिल की बेवफाईया' या शोच्या पत्रकार परिषदेत गौरवने सांगितले की, तो नेहमी आपल्या जोडीदाराला स्वतःला व्यक्त करण्याची संधी देतो आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याने नात्यामध्ये ग्रीन फ्लॅग असण्याच्या मूल्याबद्दलही सांगितले.
वैवाहिक जीवनातील प्रेम आणि स्थिरतेचे महत्त्व अधोरेखित करताना अभिनेता गौरव खन्ना म्हणाला,' माझा विश्वास आहे की वैवाहिक जीवनात स्थिरता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पाया मजबूत असेल तर इमारतही मजबूत राहते. कधीकधी लोक वैवहिक जीवनातील उत्साह आणि रोमांच यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतात, ज्यामुळे स्थिरतेवर परिणाम होतो. आणि कधीकधी याच्या उलट घडते.' तो पुढे म्हणाला, 'या दोन्हींमध्ये संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. वैयक्तिकरित्या मला माझ्या आयुष्यातील कोणत्याही निर्णयाचा कधीही पश्चात्ताप झालेला नाही. मी जे काही करतो, त्यात माझे मन आणि प्रयत्न ओततो. निकाल तुमच्या हातात नसतो, पण त्यामुळे मी प्रयत्न करणे थांबवत नाही. जर आपण पश्चातापातच गुरफटून राहिलो, तर आपण पुढे जाऊ शकणार नाही.'
[caption id="attachment_1077649" align="aligncenter" width="800"] लोकप्रिय गायक- संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह मालकिण- सीईओ काव्या मारन यांचा अलीकडेच ग्रीसमध्ये ...
'अनुपमा' मध्ये काम केल्यानंतर गौरव खन्ना ग्रीन फ्लॅग व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. आता नात्यामध्ये ग्रीन फ्लॅग असण्याच्या मूल्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, 'माझे संगोपन अशा वातावरणात झाले, जिथे माझ्या आईने नेहमीच माझ्यामध्ये चांगली मूल्ये रुजवली. समोरच्या व्यक्तीला त्यांची मते मांडण्याची पूर्ण संधी द्यायला तिने मला शिकवले. माझा नेहमी विश्वास असतो की, आपले मत दुसऱ्यावर लादण्याऐवजी आपण त्यांचा दृष्टिकोनदेखील समजून घेतला पाहिजे.' गौरव पुढे म्हणाला, 'जर समोरची व्यक्ती काही सांगत असेल तर तुम्ही ते काय म्हणत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही आयुष्यात कोणालाही काहीही करण्यास भाग पाडू शकत नाही. वाटेत अडथळे येऊ शकतात, पण ग्रीन फ्लॅग असण्याचा सर्वात चांगला फायदा हा आहे की तुम्ही गोष्टींचा जास्त विचार करत नाही. ती देवाची इच्छा आहे असे समजा; शेवटी सर्व काही ठीक होईल.'






