मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील हीरा मंझिल निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग हळूहळू पसरल्याने तिसऱ्या मजल्यावर आणि टेरेसवर अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाने वृद्ध महिला आणि दोन मुलांसह ८ जणांना सुखरूप बाहेर काढलं. या आगीत अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीही जखमी झाले असून, पहाटे ५.०५ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध महिला आणि दोन मुलांसह ८ जणांना सुखरूप वाचवण्यात आलं. आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताला दुखापत झाली आहे. ही आग मुंबई अग्निशमन दलाला रात्री १२.०७ वाजता कळवण्यात आली. हीरा मंझिल नावाच्या तळमजला अधिक तीन मजली इमारतीत आग लागली होती. ही इमारत रिलायन्स सुपरमार्केटजवळील नवजीवन सोसायटीशेजारी आहे. आग दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांमध्ये पसरली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि घरातील इतर साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दल पोहोचलं तेव्हा अनेक रहिवासी तिसऱ्या मजल्यावर आणि टेरेसवर अडकले होते.


अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरून एक पुरुष आणि दोन महिला अशा तिघांना टर्नटेबल लॅडरच्या मदतीने वाचवण्यात आलं. एका वृद्ध महिलेला पहिल्या मजल्यावरून जिन्याच्या मार्गाने बाहेर काढण्यात आलं. तर चौथ्या मजल्यावरून एक पुरुष, एक महिला, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौघांना जिन्याने सुखरूप खाली आणण्यात आलं. आगीची सुरुवातीला रात्री १२.२३ वाजता लेव्हल १ म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रात्री १२.५० वाजता ती लेव्हल २ वर गेली. आग विझवण्याचं काम कित्येक तास सुरू होतं. पहाटे ५.०५ वाजता आग आटोक्यात आली. या आगीत इलेक्ट्रिक उपकरणं, लाकडी फर्निचर, पार्टिशन, कपाटं, बेड, दरवाजे, खिडक्या, सीलिंग फॅन, स्प्लिट एसी, टीव्ही, कागदपत्रं आणि घरातील इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. पहिल्या मजल्यावरून वाचवण्यात आलेल्या महिलेला पोलीस व्हॅनमधून एच.एन. रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आलं. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं.






मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ स्टेशन अधिकारी आग विझवताना जखमी झाले. त्यांच्या उजव्या तळहाताला काप लागला. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून नायर रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना टाके घालण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अनेक पथके तैनात करण्यात आली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Comments
Add Comment

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या

विधान भवन आणि एअर इंडिया इमारतीजवळील खाद्य स्टॉल्सवर FDAचा दंड; ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित

विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरात कार्यरत असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि खाद्य

Better Roads For Dharavi: धारावीतील खराब रस्त्यांची होणार सुधारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी शहरांसह उपनगरांतील डांबरी रस्त्यांसह जुन्या

काळाचौकीच्या टेक्सटाईल म्युझियमची जागा BMC कडे हस्तांतरित, मुंबई महापालिकेला भरावा लागणार मेट्रो सेस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे पसरले असून या मेट्रो रेल्वेचा पसारा वाढू लागल्यानंतर यासाठीचा

Bhagwati Hospital: भगवती रुग्णालयांतील रुग्णांवरील उपचारासाठी जून उजाडणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालकीचे बोरीवलीतील हरिलाल भगवती मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता

गटारांच्या झाकणांनाही साखळीद्वारे करणार लॉक, BMC चा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहरातील अनेक रस्ते आणि पदपथांखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींच्या मनुष्यप्रवेश