Monday, November 23, 2026

HPV Vaccination : देशात एचपीव्ही लसीकरणाचा 1 कोटींचा टप्पा पूर्ण ! सहा राज्यांची 100 टक्के कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभियानाचे कौतुक

या अभियानात सहा राज्यांनी आपापले निर्धारित लसीकरण उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.

HPV Vaccination : देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण यश समोर आले आहे. देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय एचपीव्ही (HPV) लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त करत अभियानाशी संबंधित सर्व घटकांचे कौतुक केले आहे. एचपीव्ही लसीची प्रत्येक मात्रा मुलींना सर्व्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मोठे यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या यशाचे कौतुक केले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना निरोगी भविष्य देण्यासाठी या लसीकरण अभियानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही या कामगिरीची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, यावर्षी निश्चित करण्यात आलेल्या एकूण उद्दिष्टाच्या सुमारे 87 टक्के लक्ष्याची पूर्तता झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण अभियानाने अवघ्या नऊ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा टप्पा गाठला आहे.

उत्तर प्रदेश लसीकरणात देशात अव्वल

या अभियानांतर्गत दरवर्षी 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी सुमारे 1.15 कोटी ते 1.2 कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशने 29.33 लाखांहून अधिक मुलींना लस देत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेशनंतर बिहारमध्ये 13.70 लाख, तर गुजरातमध्ये 7.75 लाख मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे.

सहा राज्यांची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती

या अभियानात सहा राज्यांनी आपापले निर्धारित लसीकरण उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मिझोराम, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून, एचपीव्ही लसीकरणामुळे या आजाराचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे देशातील मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >