जकार्ता : चीनमधून बांगलादेशकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इंडोनेशियाच्या नौदलाने पकडले आहे. या जहाजातून तब्बल ४०५ टन 'सोडियम परक्लोरेट' हे खूपच प्रबळ ऑक्सिडायझिंग रसायन मिळाले असून, याचा वापर कारखान्यांसोबतच रॉकेटचे इंधन आणि काही स्फोटके बनवण्यासाठी केला जातो. 'एमव्ही स्टार लाईन' (MV Star Line) नावाचे आणि कोमोरोस देशाचा ध्वज असलेले हे जहाज ७ नोव्हेंबर रोजी बेलावानजवळील समुद्रात ताब्यात घेण्यात आले. इंधन भरण्यासाठी जहाज तिथे थांबले असताना नौदलाच्या जवानांना काही संशयास्पद हालचाली जाणवल्या आणि त्यानंतर तपासणी करण्याचे ठरले, असे 'वास्पडा.आयडी' (Waspada.id) या स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितले आहे. इंडोनेशियाच्या नौदलाच्या प्रादेशिक कमांड-१ (Koarmada I) चे प्रमुख रिअर ॲडमिरल डेनी सेप्टियाना यांनी २० नोव्हेंबर रोजी बेलावान येथे पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. 'केआरआय सिगालू-८५७' या गस्ती जहाजाला हे मालवाहू जहाज ठरलेल्या मार्गावरून न जाता भलत्याच मार्गाने जाताना दिसले आणि तिथूनच संशय वाढला. चौकशी व पाहणीत कागदपत्रे आणि मालात फरक आढळल्यानंतर कमांडरने मुख्यालयाशी बोलून झाडाझडतीचे आदेश दिले.
१५ कंटेनरमध्ये आढळले सोडियम परक्लोरेट
Jama Masjid Police Station Attack : मोठी बातमी : जामा मस्जिद पोलीस ठाण्यात आरोपीचा चाकूने हल्ला; पाच पोलीस जखमी, आरोपीवर गोळीबार
नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मस्जिद पोलीस ठाण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने थेट पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच ...
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावर एकूण ३६ कंटेनर होते आणि त्यातील १५ कंटेनरमध्ये सोडियम परक्लोरेट होते. पकडलेल्या या रसायनाचे एकूण वजन ४०५ टन आहे. हे एक महत्त्वाचे रसायन असून रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या इंधनातही त्याचा वापर होतो. या साठ्यातून सुमारे १०० क्षेपणास्त्रांसाठी लागणारे साहित्य तयार होऊ शकेल, असा दावा रिअर ॲडमिरल डेनी सेप्टियाना यांनी केला. याच अहवालानुसार, जहाजावर ५४ पॅलेट्समध्ये ठेवलेली लाखो कोरी आणि नोंदणी नसलेली '4G LTE' सिम कार्ड्सही नौदलाच्या जवानांना सापडली आहेत. हे जहाज चीनच्या लियान्युगांग बंदरातून निघून बांगलादेशच्या मोंगला बंदराकडे चालले होते. 'द बिझनेस स्टँडर्ड'च्या बातमीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ते मोंगला येथे पोहोचणे गरजेचे होते, पण मध्येच ते इंडोनेशियाच्या सागरी हद्दीत कोणतीही पूर्वसूचना नसताना थांबले. बांगलादेशात पोहोचण्यापूर्वीच जहाज पकडल्याने आणि मालाची संपूर्ण माहिती असलेला 'इम्पोर्ट जनरल मॅनिफेस्ट' हाती नसल्याने, हा माल नेमका कोणी मागवला होता हे अद्याप समजू शकलेले नाही; त्यासाठी पुढे सखोल तपास करावा लागेल.
जहाजाच्या कागदपत्रांमध्ये मोठा घोळ
जहाजाच्या नोंदणीच्या कागदपत्रांमध्येही गंभीर चुका आढळून आल्याचे इंडोनेशियन नौदलाने स्पष्ट केले आहे. अहवालानुसार, कागदपत्रांवर 'IMO' क्रमांक ८३५६९६२, अधिकृत क्रमांक १९०२३८४ आणि कॉल साइन 'D-6A4384' असे लिहिले होते. ८ ऑक्टोबर २०२७ पर्यंत वैधता लिहिली असली, तरी प्रत्यक्षात या नोंदणीची मुदत निलंबित (Suspended) असल्याचे समोर आले. जहाजाची नोंदणी निलंबित असणे, शिपिंगच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड असण्याची शक्यता आणि रेडिओ संदेशांना उत्तर न देणे या बाबीही पुढे आल्या आहेत. प्रशासकीय नोंदी, प्रवासाच्या परवानग्या वैध आहेत की नाही आणि धोकादायक माल वाहतुकीच्या नियमांचे पालन केले आहे की नाही, याची तपासणी सुरू असल्याचे डेनी सेप्टियाना यांनी सांगितले.
चौकशी सुरू; सोडियम परक्लोरेट म्हणजे नक्की काय ?
हा माल कोणी पाठवला आणि यामागे कोण आहे, हे शोधण्यासाठी जहाजावरील लोकांची चौकशी सुरू आहे. मात्र, शिपिंग कंपनी, मालाचे मालक किंवा हा माल कोणासाठी जात होता, याची नावे नौदलाने अद्याप जाहीर केलेली नाहीत. सोडियम परक्लोरेट (NaClO 4 NaClO 4) हे एक ताकदवान ऑक्सिडायझिंग रसायन आहे, ज्याचा वापर प्रयोगशाळा, उद्योगधंदे, रॉकेटचे इंधन, स्फोटके आणि फटाके/पायरोटेक्निक वस्तूंमध्ये होतो. हे रसायन स्वतः थेट स्फोटक किंवा इंधन नसले, तरी काही परिस्थितीत आग पेटण्यास किंवा ज्वलनास मदत करू शकते; तसेच मोठ्या प्रमाणात साठा असल्यास आग किंवा स्फोट होऊ नये म्हणून काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते. बांगलादेशकडे निघालेल्या या ४०५ टन मालाचा मालक कोण, तो कुठून आला आणि कोणाकडे जाणार होता, यावरून आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.