Monday, November 23, 2026

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळीन आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. लोकप्रतिनिधीने फक्त सभागृहात प्रश्न मांडून थांबू नये, तर त्या प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेऊन न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणं महत्त्वाचं असतं, असं त्यांनी सांगितलं.

विधानपरिषदेतील कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचं प्रकाशन सोमवारी (२३ नोव्हेंबर ) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झालं. लोकभवन येथील जलभूषण सभागृहात झालेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या चौथ्या खंडात २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालखंडातील विधानपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. सभागृहातील भाषणे, अर्थसंकल्पावरील चर्चा, जनहिताच्या प्रश्नांवर उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा यांचा समावेश आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ अहवाल न राहता महाराष्ट्राच्या विधिमंडळीन कार्यपद्धतीचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळीन आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. लोकप्रतिनिधीने फक्त सभागृहात प्रश्न मांडून थांबू नये, तर त्या प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेऊन न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणं महत्त्वाचं असतं, असं त्यांनी सांगितलं. डॉ. गोऱ्हे यांनी महिला, बालके, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेरही प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि सभागृहातही आक्रमकपणे प्रश्न मांडले. प्रश्नांची अचूक माहिती गोळा करणं, शासनाकडे पाठपुरावा करणं आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणं, ही त्यांच्या कामाची खास पद्धत असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणं सोपं नाही. त्यासाठी प्रामाणिकपणा, अभ्यास आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी लागते. अशा प्रकारचे कार्य अहवाल इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारे ठरतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या खंडात महिला व बालकांची सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, कामगार, दुष्काळ, पुनर्वसन, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, सामाजिक न्याय आणि स्थानिक विकास अशा विषयांवरील कामकाज आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये पीडितांना पोलीस मदत, वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि कायदेशीर आधार वेळेत मिळावा, यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख आहे. पुस्तकातून प्रश्न सभागृहात कसा आला, चर्चा काय झाली, शासनाने काय प्रतिसाद दिला आणि नंतर काय पाठपुरावा झाला, याची एकत्रित माहिती मिळते. त्यामुळे हा खंड सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरेल. पुढील पाचव्या खंडात २०२२ नंतरच्या कामकाजाचा आढावा अपेक्षित असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >