Monday, November 23, 2026

Devendra Fadnavis : एनटीएच्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढवण्यावर भर; उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा

परीक्षांच्या आयोजनात राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

मुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आयोजित करत असलेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांच्यात मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक झाली. परीक्षांच्या आयोजनात राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची उपलब्धता वाढवण्यावर भर

NTA मार्फत मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देणे, केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्था उभारणे या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना केंद्रीय परीक्षा संस्था आणि राज्य शासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. परीक्षा केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ग्रामीण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुलभ करण्याचा विचार

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी समान संधी मिळावी, यावरही बैठकीत भर देण्यात आला. इंग्रजी भाषेमुळे अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आवश्यक बदलांवर चर्चा झाली.

परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अधिक परीक्षा संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा पद्धती ठरवणे आणि स्पर्धा व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही विचारविनिमय झाला.

बैठकीला उच्चस्तरीय कृतीदलाचे सदस्य उपस्थित

या बैठकीला कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा आणि राष्ट्रीय भरती संस्थेच्या (NRA) संचालक श्रुती सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

NTA च्या परीक्षा आयोजनात केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय वाढवून विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी केंद्रित परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >