नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील रस्ते, चौक आणि पदपथ मोकळे राहावेत, यासाठी बेरोजगार तरुणांना चहा टपरी, खाद्यपदार्थ विक्री केंद्र किंवा अन्य छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अशासकीय ठरावांना मंजुरी देणे बंद करण्यात आल्याचे समजते.
एवढेच नव्हे, तर गेल्या सहा वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या अशा ठरावांचाही फेरआढावा घेऊन ते रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमका काय होता अशासकीय ठरावांचा प्रकार ?
महापालिकेत नगरसेवकांची सत्ता असताना प्रभागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून विविध प्रस्ताव मांडले जात होते. यामध्ये चहा टपरी, खाद्यपदार्थ विक्री केंद्र तसेच अन्य छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात होती. यासाठी स्थायी समितीमध्ये अशासकीय ठराव मांडले जात. या ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत होती.
मात्र, महापालिकेतील मागील चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा नगरसेवकांची सत्ता अस्तित्वात आली. त्यानंतर प्रभागातील बेरोजगार तरुण आणि कार्यकर्त्यांना व्यवसायाची संधी मिळवून देण्यासाठी अशा स्वरूपाचे प्रस्ताव पुन्हा पुढे येऊ लागले होते. मात्र, आता प्रशासनाच्या नव्या भूमिकेमुळे या प्रस्तावांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
Nashik News : काळजाचा ठोका चुकवणारा क्षण ! बोअरवेल मध्ये पडलेल्या चिमुकल्या शंभुची 45 मिनीटात सुखरूप सुटका , ग्रामस्थांच्या धाडसामुळे थोडक्यात बचावले प्राण
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला तब्बल २०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच ...
सिंहस्थासाठी रस्ते आणि पदपथ मोकळे ठेवण्यावर भर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये लाखो भाविक आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि प्रमुख रस्त्यांसह चौक व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. रस्त्यांच्या कडेला किंवा पदपथांवर नव्या टपऱ्या आणि विक्री केंद्रांना परवानगी दिल्यास अतिक्रमण वाढण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अशा ठरावांना मंजुरी न देण्याची भूमिका घेतल्याचे समजते.