गोवा : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महोत्सवातील वेव्हज् फिल्म बझार विभागात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने एन. डी. स्टुडिओचे (एनडीज् आर्ट वर्ल्ड) स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला देश-विदेशांतील चित्रपट निर्माते, चित्रकर्मी, माध्यम प्रतिनिधी आणि सिनेरसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एन. डी. स्टुडिओच्या सुविधा आणि वारशाची माहिती
दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून एन. डी. स्टुडिओची निर्मिती झाली. 2024-25 पासून या स्टुडिओचे संचालन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून केले जात आहे. स्टुडिओचा कलात्मक वारसा, भव्य सेट, चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा आणि विविध उपक्रमांची माहिती या दालनातून दिली जात आहे.
महामंडळ 2015 पासून इफ्फीमध्ये सहभागी होत आहे. मात्र, यंदा प्रथमच महामंडळाच्या दालनासोबत एन. डी. स्टुडिओचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी 50 टक्के सवलत, चित्रपट पर्यटन आणि विविध समारंभांच्या आयोजनाला प्रोत्साहन देण्याचे उपक्रम राबवले जात आहेत.
FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. ...
आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते उद्घाटन
वेव्हज् फिल्म बझारमधील एन. डी. स्टुडिओच्या दालनाचे उद्घाटन महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी स्टुडिओशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत, ‘हा स्टुडिओ माझे होमग्राउंड आहे’, अशी भावना व्यक्त केली.
या दालनाला अमेरिका, स्पेन, कझाकिस्तान, दुबई आणि हाँगकाँग येथील कार्यकारी निर्मात्यांसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी भेट दिली. ऑस्कर अकादमीचे भारतीय प्रतिनिधी उज्ज्वल निरगुडकर यांनीही दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. चित्रपट निर्मिती, प्रशिक्षण, चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक सहकार्याच्या संधींबाबतही अभ्यागतांशी चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर चित्रनगरीचेही स्वतंत्र दालन
यंदाच्या इफ्फीमध्ये कोल्हापूर चित्रनगरीनेही प्रथमच सहभाग नोंदवला आहे. वेव्हज् फिल्म बझार विभागात चित्रनगरीचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या माध्यमातून चित्रनगरीचा इतिहास, उपलब्ध सेवा-सुविधा आणि येथे चित्रीत झालेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली जात आहे.
एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर चित्रनगरीच्या या सहभागामुळे महाराष्ट्रातील चित्रीकरण सुविधा आणि चित्रपट पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.