Tuesday, November 24, 2026

Babasaheb Patil : कर्जदाराला एक वर्षाचा दिलासा देण्याची सूचना - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

एफआरपीपेक्षा जास्त दर देणारे कारखानेही आहेत; उसाला ठरलेल्या दरानुसार पैसे द्यावेच लागतील

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :

उसाच्या दराचा प्रश्न, साखर कारखान्यांकडून दिली जाणारी एफआरपी, सहकारी संस्थांमधील आर्थिक व्यवहार, अवैध सावकारी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा तगादा अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते.

या वेळी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कामकाजाबाबतही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. या संस्थांना परवाने देण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या कामकाजासंदर्भातील बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. मायक्रो फायनान्स संस्थांनी तूर्तास थांबावे आणि कर्जदारांना एक वर्षाचा दिलासा म्हणजेच रिलीफ द्यावा, अशा प्रकारच्या सूचना केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना कर्जवसुलीच्या दबावातून दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्स संस्थांच्या कामकाजाबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

राज्यात उसाच्या दरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष सुरू असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एफआरपीबाबत भूमिका स्पष्ट केली. आंदोलनाच्या संदर्भातील २४ तारखेच्या पत्राचा दाखला देत शासनाने निश्चित केलेली एफआरपी लागू असताना वेगळा दर नव्याने जाहीर करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये साखरेचा उतारा अर्थात रिकव्हरी वेगवेगळी असते. कोल्हापूर भागात काही कारखान्यांचा साखर उतारा १३ टक्क्यांपर्यंत असल्याने तेथील दराचे गणित वेगळे असते. पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यातही पाण्याची उपलब्धता, आडसाली उसाचे प्रमाण आणि उत्पादन परिस्थितीनुसार रिकव्हरीमध्ये फरक पडतो. त्यामुळे सर्व भागांतील कारखान्यांच्या दरांची एकाच निकषावर तुलना करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनेक साखर कारखान्यांनी शासनाने निश्चित केलेल्या एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित असून, त्यापेक्षा अधिक दर देणाऱ्या कारखान्यांची उदाहरणेही आहेत, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि अपेक्षित दर यांचा विचार करता सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या वेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे वाढली आहेत. यावर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी अधिक व्याजाचे आमिष दाखविणाऱ्या संस्थांच्या प्रलोभनाला बळी पडून आयुष्यभराची पुंजी धोक्यात घालू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. कोणत्याही संस्थेत ठेवी ठेवण्यापूर्वी त्या संस्थेची विश्वासार्हता, संचालक मंडळाची पार्श्वभूमी तसेच संस्थेचे आर्थिक व्यवहार तपासून घ्यावेत. केवळ जास्त व्याज मिळते म्हणून ठेवी ठेवण्याचा निर्णय घेऊ नये. आपल्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

अवैध सावकारीचा प्रश्न गंभीर

ग्रामीण भागातील अवैध सावकारीचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांना या जाचातून मुक्त करण्यासाठी शासनाकडून कारवाई केली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचे सातबारा उतारे परत मिळवून देण्यात आले आहेत. सहकार विभागामार्फत संबंधित प्रकरणांची शहानिशा केली जाते. अवैध सावकारी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित सावकारांविरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाते. सरकारसाठी शेतकरी महत्त्वाचा असून, त्याच्यावर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >