Tuesday, November 24, 2026

अक्षयच्या कामाची शिस्त आणि दीपिकाचा हक्क! करण जोहरने मांडली फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या तासांवर भूमिका

करण जोहरने अक्षय कुमारच्या कामाप्रती असलेल्या शिस्तीचे आणि समर्पणाचे भरभरून कौतुक केले. त्याचबरोबर दीपिका पदुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या शिफ्टच्या मागणीला पाठिंबा देत, महिला कलाकारांनाही पुरुष कलाकारांप्रमाणे कामाच्या वेळांबाबत स्वातंत्र्य आणि आदर मिळायला हवा, अशी भूमिका मांडली.

'कॉफी विद करण' शोच्या नवव्या सीझनच्या येत्या भागात अभिनेते अक्षय कुमार आणि रवि किशन उपस्थित राहणार आहेत. या एपिसोड दरम्यान करण जोहरने अक्षयच्या कामाप्रती असलेल्या शिस्तबद्ध दृष्टिकोनाचे कौतुक केले. तसेच दीपिका पदुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीला पाठिंबा दिला. करण जोहरने अक्षय कुमारच्या पहाटेच्या दिनचर्येबद्दलच्या अफवा फेटाळून लावल्या आणि उलट अभिनेत्याच्या शिस्तीचे आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले.

अक्षय सोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगताना करण म्हणाला, 'जेव्हा मी अक्षयसोबत पहिला चित्रपट केला, तेव्हा अक्षय हे करतो, अक्षय ते करतो अशा चर्चा नेहमीच सुरू असायच्या. पहिली गोष्ट म्हणजे, मी इतकी मेहनत करणारा माणूस कधीच पाहिला नाही. तो पहाटे ५ वाजता मिटिंग घेतो. त्याला त्याची स्क्रिप्ट तोंडपाठ असते आणि तो नेहमी दिग्दर्शकाला पाठिंबा देतो व निर्मात्याच्या कामाची खूप जाणीव ठेवतो. आणि तो एकमेव सुपरस्टार आहे जो नवोदित दिग्दर्शकाला संधी देतो; ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी त्याला पुरेसे श्रेय मिळत नाही.'

अक्षय कुमारच्या शिस्तबद्ध कामाच्या वेळापत्रकाची आणि चित्रपटसृष्टीतील कामाच्या तासांवरून सुरू असलेल्या चर्चेची तुलना करत करण जोहर म्हणाला, महिला कलाकारांनाही त्यांच्या पुरुष सहकलाकारांप्रमाणेच आदर आणि लवचिकता दिली पाहिजे. एका वृत्तानुसार, त्याने दीपिका पदुकोणच्या कामाच्या तासांवरील भूमिकेचे समर्थन केले आणि म्हणाला, 'म्हणूनच मी दीपिका पदुकोणसारख्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करतो. जेव्हा ती असे काही म्हणते तेव्हा त्याचा इतका मोठा मुद्दा का बनवला जातो हे मला कळत नाही. ती तिचा हक्क आहे तिने तो हक्क मिळवला आहे. ती एक मेहनती स्त्री आहे. ती एक आई आहे, ती पत्नी आहे, ती एक व्यावसायिक आहे आणि तिचे वैयक्तिक आयुष्यही आहे. जेव्हा तुम्ही मागणी करता तेव्हा ती का करू शकत नाही?' करणने पुढे सांगितले की पुरुष सहकलाकारांप्रमाणेच महिला सुपरस्टार्सनाही कामाच्या बाबतीत मर्यादा ठरवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >