Tuesday, November 24, 2026

Bhiwandi News : धक्कादायक! शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा; लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू

बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ठाणे : भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

शोरमा खाल्ल्यानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास

प्राथमिक माहितीनुसार, वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून काही नागरिकांनी शोरमा खाल्ला होता. त्यानंतर रात्रीपासून अनेकांना उलटी, जुलाब, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला एकाच कुटुंबातील 4 ते 5 जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याकडून इतर नागरिकांनीही त्याच दुकानातून शोरमा खाल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासन सतर्क झाले.

लहान मुले आणि महिलांचाही समावेश

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांमध्ये महिलांची आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 12 ते 13 रुग्ण उपचारासाठी आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामध्ये 4 ते 5 महिला, 5 ते 6 लहान मुले आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाई होणार?

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी विविध ठिकाणी मोहिमा राबवल्या जात आहेत. काही आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत भिवंडीतील ही घटना समोर आल्याने खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार का आणि दोष आढळल्यास प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. शोरमामुळेच विषबाधा झाली का, हे तपासानंतर स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >