ACC Men's Asia Cup Rising Stars 2026 : भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान
युएई आणि नेपाळला पराभूत केल्यानंतर भारत 'ए' संघाने एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, त्यांचा सामना अपराजित राहिलेल्या श्रीलंका 'ए' संघाशी दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर होणार आहे.
November 25, 2026 07:46 PM
ACC Men's Asia Cup Rising Stars 2026 : भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान (Photo: BCCI Twitter)
भारत 'ए' संघाने युएईला पराभूत करून एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेपाळ आणि युएईला पराभवाची धूळ चारत भारताने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका 'ए' संघाशी होणार आहे. आतापर्यंत श्रीलंकेच्या संघाने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यात भारताने साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध सामना गमावला आहे. त्यामुळे या लढतीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. दुसरीकडे, पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना 27 नोव्हेंबरल होणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तानने विजय मिळवला तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडतील.
स्पर्धेच्या 'ब' गटात असलेल्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नेपाळला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शतकांच्या जोरावर भारताने नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना, नेपाळ पहिल्याच षटकापासून बॅकफूटवर गेला. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे नेपाळचा संघ केवळ 26 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना गमावला. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाकडून शहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके झळकावली, तर कर्णधार तिलक वर्माने शतक केले. पण, भारताला विजय मिळवण्यासाठी हे पुरेसे नव्हते. भारत हा सामना 48 धावांनी गमावला. भारताचा गटातील शेवटचा सामना युएईविरुद्ध होता. भारतासाठी हा 'करा किंवा मरा' सामना होता. प्रथम फलंदाजी करताना युएईने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीच्या (53 चेंडूंत 204 धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर अवघ्या 14.2 षटकांत पूर्ण करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
भारत न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला. त्यामुळे दुसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार ...
श्रीलंकेने 'ए' गटात वर्चस्व गाजवले असून ते आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिले आहेत. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात सहा गडी राखून पराभूत केले.दुसऱ्या सामन्यात त्यांनी हाँगकाँग आणि चीनला 24 धावांनी पराभूत केले. श्रीलंकेचा गटातील तिसरा आणि अंतिम सामना बांगलादेशविरुद्ध होता. दरम्यान, श्रीलंकेने सात गडी राखून सामना जिंकून अंतिम चारमध्ये प्रवेश केला असून, आता त्यांचा सामना भारताशी होईल.