
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भिस्तबाग, पवननगर येथील संभाजी महाराज कुस्ती केंद्रात 15 व 20 वर्षे वयोगटातील फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीत 15 वर्षे वयोगटात 109, तर 20 वर्षे वयोगटात 82 अशा एकूण 191 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. मॅटवर रंगलेल्या चुरशीच्या लढतींमुळे उपस्थितांना कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळाला.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर महिन्यात अहिल्यानगर शहरात राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा संघ निवडण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, हा या निवड चाचणीमागील उद्देश आहे. या वेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव पैलवान संतोष भुजबळ म्हणाले की, खेळाडू हा स्पर्धांच्या माध्यमातून घडत असतो. त्याला आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. आमदार जगताप यांच्या सहकार्याने जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आज इतिहास घडला आहे! अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क करत अवघ्या 52 चेंडूत ...
अहिल्यानगर जिल्ह्यातून चांगले कुस्तीपटू निर्माण होत आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. कुस्तीपटूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी वारंवार स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पैलवान शिवाजी चव्हाण म्हणाले की, संभाजी महाराज कुस्ती केंद्रात जिल्हास्तरीय फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 191 कुस्तीपटूंनी सहभाग घेतला.
अहिल्यानगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त कुस्तीपटू निर्माण व्हावेत आणि त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचावावे, या उद्देशाने जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध वजन गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले. या निवड चाचणीप्रसंगी नितीन आव्हाड, निलेश मदने, पैलवान संग्राम शेळके, प्रमोद गोडसे, शंकर खोसे, युवराज चव्हाण आदींसह खेळाडू, पालक आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





