
गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज एका वेगळ्याच धाटणीच्या गुजराती चित्रपटाची झलक पाहायला मिळाली. मनीष सैनी यांनी दिग्दर्शन केलेला 'भाई बँड' हा चित्रपट गाला प्रीमियर विभागात दाखवण्यात आला आणि त्याने उपस्थितांची मने जिंकली. हा चित्रपट आहे दोन भावांच्या नात्याचा. गावातल्या लग्नांमध्ये पारंपरिक बँड वाजवून पोट भरणारे हे दोन भाऊ. एकाच व्यवसायात असूनही त्यांच्यात मतभेद होतात आणि दोघेही वेगवेगळ्या वाटेला जातात. कथा इथेच थांबत नाही. काही आठवड्यांनंतर त्यातला एक भाऊ गावात परत येतो, पण यावेळी त्याच्याकडे पारंपरिक वाद्यं नसतात. त्याच्याकडे असतो भलामोठा डीजे, मोठे स्पीकर आणि फोनमध्ये साठवलेली गाण्यांची यादी.
आता प्रश्न उभा राहतो, पारंपरिक बँड टिकणार की डीजे जिंकणार? या संघर्षातूनच चित्रपट पुढे सरकतो. बदलतं तंत्रज्ञान, लग्नांची बदललेली पद्धत आणि त्याचा पारंपरिक व्यवसायांवर होणारा परिणाम याचं खूप सहज, हलक्याफुलक्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलं आहे. सोबतच भावांमधलं प्रेम, रुसवे-फुगवे आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारी माया याचीही सुंदर गोष्ट यातून उलगडते. पत्रकारांशी बोलताना दिग्दर्शक मनीष सैनी म्हणाले, चित्रपट गुजराती असला तरी त्याची भावना सगळ्या भारताला आपलीशी वाटेल. 'भाई बँड' हे नाव मला दोन कारणांसाठी आवडलं. एक तर दोन भावांची मैत्री आणि दुसरं म्हणजे लग्नातला बँड. दोन्ही अर्थ या नावात बसतात.
http://prahaar.in/2026/11/25/gautam-adani-attends-mumbai-book-festival-urges-students-to-learn-from-books-and-contribute-to-nation-building/या चित्रपटातून गुजराती सिनेमात पदार्पण करणारा अभिनेता प्रित कमानी यानेही आपला अनुभव शेअर केला. हा चित्रपट खूपच एनर्जेटिक आणि मजेशीर असल्याचं त्याने सांगितलं. शूटिंगदरम्यान मिळालेलं मोकळं वातावरण आणि सर्जनशील स्वातंत्र्य यामुळे काम करायला खूप मजा आली, असं तो म्हणाला. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याने स्वतःहून दिग्दर्शकांकडे स्क्रीन टेस्टची मागणी केली होती, असा रंजक किस्साही त्याने सांगितला. तर गायकाची भूमिका साकारणाऱ्या चिराग कत्रेचा याने पात्रात शिरण्यासाठी किती मेहनत घेतली, याबद्दल सांगितलं. गायक होणं सोपं नव्हतं, पण तो अनुभव खूपच भारी होता, असं तो म्हणाला. अभिनेत्री श्रद्धा डांगरने आपलं पात्र गोड आणि आनंदी स्वभावाचं असल्याचं सांगत संपूर्ण टीमसोबत काम करताना खूप आनंद मिळाल्याचं सांगितलं. एकंदरीत, विनोद, संगीत आणि नात्यांची हळवी गोष्ट यांचा सुंदर मिलाफ म्हणजे 'भाई बँड'.






