Wednesday, November 25, 2026

Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘पूल तिथे बंधारा बंधनकारक

- गरजेनुसार चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी; दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत पूल वजा बंधारा बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर आणि धाराशिवसह गरज भासेल तिथे तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सांगितले.

मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक झाली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडविणार पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शासनाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी व नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाला बंधारा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडवले जाईल, असे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि बिहार सरकारच्या धर्तीवर, राज्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारी माती व मुरूम जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या तलावांमधून उपसण्यात येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे राज्यातील मोठी धरणे व तलावांचे खोलीकरण होऊन गाळ उपसण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

राज्यातील काही भागांत निर्माण झालेली चारा टंचाई लक्षात घेता, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्यास तत्काळ परवानगी देण्यात आली आहे. चारा पुरवठ्यासाठी २०१९ मधील जुनेच दर लागू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, गोशाळा चालविण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्थांना गायरान जमिनी २ ते ३ वर्षांच्या भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्याचा आणि ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार गायरान जमिनीवर २ ते ३ एकरांचे छोटे तलाव बांधण्याचा सकारात्मक विचार राज्य सरकार करत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाबाबतच्या काही मागण्यांबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रातील मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येईल. त्यासाठी लवकरच बैठक आयोजित करुन त्यातील कोणत्या मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत यावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.

बैठकीत काय निर्णय झाले? 

- ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मालगुजारी तलावांतील गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याच्या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी ३२ रुपये आणि वाहतुकीसाठी ३७ रुपये प्रति घनमीटर (कमाल अनुदान ३७ हजार ५०० रुपये) दर निश्चित करण्यात आले आहेत. - वनपट्टे धारक आणि रेकॉर्ड नसलेल्या परंतु प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या (विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील) शेतकऱ्यांना ५ हजाप रुपयांचे अंतिम अनुदान व पुढील एनडीआरएफ/एसडीआरएफ मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, प्रलंबित 'फार्मर आयडी' काढण्यासाठी महसूल व कृषी विभागाने एसओपी जारी केली आहे. - मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची मजुरी ३१७ रुपयांवरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच, जलजीवन मिशनच्या अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी देऊन टँकरमुक्तीसाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - सुकत चाललेल्या फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी केली. त्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या, तर ऊसाला मूरघास करण्याची परवानगी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. याबाबत अभ्यास करून पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >