Wednesday, November 25, 2026

Flipkart CEO : फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; 11 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीची पाचपट वाढ

कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली. कृष्णमूर्ती यांनी फ्लिपकार्टमध्ये 11 वर्षांहून अधिक काळ काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठी व्यावसायिक प्रगती केली.

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कल्याण कृष्णमूर्ती आपल्या पदाचा कार्यकाळ संपवत आहेत. कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली. कृष्णमूर्ती यांनी फ्लिपकार्टमध्ये 11 वर्षांहून अधिक काळ काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठी व्यावसायिक प्रगती केली.

कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली व्यवसायाची पाचपट वाढ

फ्लिपकार्टने दिलेल्या निवेदनानुसार, कृष्णमूर्ती यांनी कंपनीच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण दशकात नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीच्या व्यवसायात पाचपटहून अधिक वाढ झाली. त्यामुळे भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये फ्लिपकार्टचे स्थान अधिक मजबूत झाले.

'द बिग बिलियन डेज'ला मिळाली विशेष ओळख

कल्याण कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली फ्लिपकार्टची 'द बिग बिलियन डेज' ही वार्षिक सेल मोहीम देशभरात लोकप्रिय झाली. भारतातील सणासुदीच्या खरेदीशी या मोहिमेचे नाव जोडले गेले. याशिवाय कंपनीने देशभरात व्यवसायाचा विस्तार केला, अनेक नवे उपक्रम सुरू केले आणि ग्राहक व विक्रेत्यांसाठी विविध सेवा विकसित केल्या. फ्लिपकार्टच्या मते, कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वामुळे केवळ कंपनीची आर्थिक वाढ झाली नाही, तर विक्रेते, उद्योजक आणि ग्राहकांसाठीही नव्या संधी निर्माण झाल्या.

वॉलमार्टकडून कृष्णमूर्ती यांच्या योगदानाचे कौतुक

वॉलमार्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि CEO ख्रिस निकोलस यांनीही कृष्णमूर्ती यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वामुळे फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन्ही कंपन्यांना फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले. कंपनीसाठी त्यांनी उभारलेली प्रशासन व्यवस्था आणि दिलेल्या योगदानाबद्दल निकोलस यांनी आभार मानले.

'फ्लिपकार्टच्या प्रवासाचा भाग होणे हा सन्मान'

पद सोडताना कल्याण कृष्णमूर्ती यांनी फ्लिपकार्टच्या प्रवासाचा भाग होणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे सांगितले. कंपनीने उभारलेल्या व्यवसायाचा आणि त्यामागील नैतिक मूल्ये, सचोटी व प्रशासनाच्या पद्धतींचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लाखो भारतीयांच्या खरेदीच्या सवयी बदलण्यात आणि देशभरातील विक्रेत्यांना संधी उपलब्ध करून देण्यात कंपनीच्या टीमचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. कृष्णमूर्ती यांच्या पुढील वाटचालीबाबत आणि फ्लिपकार्टच्या नव्या CEO संदर्भात कंपनीकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >