
मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी माराव्या लागणाऱ्या कार्यालयीन फेऱ्या आणि कागदपत्रांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाची कटकट आता संपणार आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. नव्या व्यवस्थेनुसार अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार असून, अर्जाची स्थितीही संकेतस्थळावर पाहता येईल. आवश्यकतेनुसार सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) तांत्रिक मदतीने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (सीसीव्हीआयएस) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑगस्ट २०२० पासून जात पडताळणी समित्यांचे कामकाज अंशतः ऑनलाइन सुरू होते. मात्र, नव्या व्यवस्थेत अर्जदारांना कागदपत्रांच्या प्रती समिती कार्यालयात प्रत्यक्ष जमा कराव्या लागणार नाहीत. जात वैधतेसाठीचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारेच स्वीकारले जाणार असून, अन्य मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मंजूर नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ...
अर्जदारांना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून प्रणालीवर अपलोड करावी लागतील. जात नोंदीसंदर्भातील आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासासंदर्भातील प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. मात्र, आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर समिती कार्यालयातील लिपिकाकडून त्याची तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जातील तपशील, कागदपत्रांची उपलब्धता, त्यांची वाचनीयता आणि मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली आहेत की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. अर्जात त्रुटी आढळल्यास त्या अर्जदाराला कळविण्यात येतील. त्यानंतर सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अर्ज आणि पुराव्यांची गुणवत्तेच्या आधारे पडताळणी करतील. जात दावा आणि रहिवास सिद्ध होत असल्यास अर्ज वैधतेच्या निर्णयासाठी समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांकडे पाठविला जाईल.
समितीचे अध्यक्ष आणि अन्य दोन सदस्य अर्ज व पुराव्यांची तपासणी करतील. पुरावे योग्य आढळल्यास डिजिटल स्वाक्षरीने जात वैधता प्रमाणपत्र जारी केले जाईल. संबंधित आस्थापनांकडून पुराव्यांची पडताळणी आवश्यक असल्यास त्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. तसेच दक्षता पथकामार्फत चौकशीची गरज वाटल्यास प्रकरण त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. अर्जदाराला सुनावणी देण्याची आवश्यकता भासल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल. विशेष आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये बार्टीच्या महासंचालकांची खात्री झाल्यानंतरच प्रत्यक्ष सुनावणी घेण्यास परवानगी दिली जाईल. अर्जदाराच्या जात दाव्याबाबत शंका निर्माण झाल्यास दक्षता पथकाच्या अहवालानंतर नमुना २५ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतरच निर्णय घेता येईल. वाजवी संधी आणि सुनावणी दिल्याशिवाय जात दावा अवैध ठरविता येणार नाही. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र अर्जासोबत पुरावा म्हणून जोडल्यास ते प्रमाणपत्रही प्रणालीवर ऑनलाइन प्रसिद्ध करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : कोयना धरणातील पाणी मुंबईला वळवले जात असल्याच्या आरोपांवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईसाठी सातारा ...
जात पडताळणी समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत जात वैधतेबाबत निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. समितीचा निर्णय एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे अर्जदाराला कळविला जाईल. अर्जातील त्रुटींची पूर्तता न झाल्यास पुढील दोन महिने ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्जदाराला त्याबाबत सूचना दिल्या जातील. पाचव्या महिन्यात त्रुटी दूर करण्यासाठी अंतिम संधी म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद दिला नाही किंवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर प्रकरण निकाली काढण्यात येईल.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुधारित शुल्क
नव्या ऑनलाइन प्रणालीच्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे सेवा शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, तर महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सेवाविषयक प्रयोजनासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ किंवा सवलती मिळविण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास १ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज कुठे कराल?
जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज https://www.cvc.barti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज भरण्यापासून ते प्रक्रियेतील शंकांचे निरसन करण्यापर्यंत एआय आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन मिळणार आहे. नव्या व्यवस्थेमुळे कागदपत्रांची पुनरावृत्ती, कार्यालयीन फेऱ्या आणि प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे.





