Wednesday, November 25, 2026

पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.

मुंबई : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्याने निश्चित केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे (वर्ल्ड मेयर्स फोरम) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेस केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजकिशोर मोदी, यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक, लोकप्रतिनिधी आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारतात पूर्वी शहरीकरणाला समस्या मानून ते रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शहरीकरण रोखता आले नाही आणि त्याचे योग्य नियोजनही झाले नाही. परिणामी अनियोजित शहरे, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका मांडली. त्यानंतर देशातील शहरी प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली.

मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. 300 किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, या ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी विकसित करण्यात येत आहे. येथे शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, नवोपक्रम आणि जागतिक कंपन्यांच्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी स्वतंत्र परिसंस्था उभारण्यात येणार आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि 12 जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, ते जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेन आणि सुपर एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून या परिसराला मुंबईशी जोडण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >