Thursday, November 26, 2026

26/11 Mumbai Attack: 26/11 हा भारतीय संविधानावरील हल्ला होता!

मुख्यमंत्र्यांकडून शहीदांना मानवंदना; 12 वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दहशतवादी कारवायांचा बिमोड

मुंबई : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यातील शहीदांना गेट वे ऑफ इंडिया येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी ताज आणि ट्रायडंटसारखी ठिकाणे लक्ष्य करण्यामागील हेतू स्पष्ट करताना, हा हल्ला भारताच्या संविधानावर झालेला आघात असल्याचे सांगितले. “इतिहासातून शिकायचे असते आणि भविष्याचा वेध घ्यायचा असतो. जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याला वर्तमान असते; पण भविष्य नसते,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक अशा जागा निवडल्या होत्या, जिथे जास्तीत जास्त नुकसान होईल आणि अधिकाधिक लोक मृत्युमुखी पडतील. ताज आणि ट्रायडंटसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजनैतिक अधिकारी आणि वेगवेगळ्या देशांचे नागरिक असतात. अशा ठिकाणी हल्ला करून संपूर्ण जगाला भारतावर हल्ला केल्याचा संदेश द्यायचा होता. आपल्या जवानांनी त्यांचा मुकाबला केला. करकरे, कामटे आणि साळसकर लढले. तुकाराम ओंबळे यांनी कसाब हा दहशतवादी असल्याचे ओळखले. त्याच्याकडे बंदूक होती आणि ओंबळे यांच्याकडे फक्त दांडुका होता. शरीरात गोळ्या घुसत असतानाही त्यांनी त्याची पर्वा केली नाही आणि कसाबला पकडले. कसाब पकडला गेल्यामुळे संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला. हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद असल्याचे जगाने मान्य केले.”

“हा दिवस आपण विसरू शकत नाही आणि विसरायचाही नाही. हा संविधानावर झालेला हल्ला होता. यापुढे असा हल्ला होऊ द्यायचा नाही. शहीदांना श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही सर्वजण दहशतवादाविरोधात एक आहोत, हा संदेश देत आहोत. मुंबई थांबली नाही आणि मुंबई कधीही थांबत नाही. कितीही प्रयत्न झाले तरी आमचा निर्धार कोणताही दहशतवादी थांबवू शकत नाही, हे मुंबई आणि महाराष्ट्राने दाखवून दिले आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

भारताने रौद्ररूप दाखवून दिले

पहलगामची घटना मानवतेला काळिमा फासणारी होती. मात्र, त्यानंतर भारताने आपले रौद्ररूप दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उरी, पहलगाम किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी भारताचे जवान आणि नागरिकांवर हल्ला झाला, तर भारत तो सहन करणार नाही. भारत पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला करेल आणि अशा हल्ल्यांचा बदला घेईल, हे आपण दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत मुंबईत किंवा देशात दहशतवादी घटना पूर्णपणे संपल्या आहेत. काही प्रयत्न झाले, तरी ते उखडून टाकण्यात आले. इतिहासातून शिकायचे असते, भविष्याचा वेध घ्यायचा असतो. घडलेली घटना लक्षात ठेवून शहीदांना नमन करणे आणि त्यातून भविष्याचा बोध घेणे, यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >