Thursday, November 26, 2026

Save Mumbai Playgrounds: मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का? पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनाला सवाल!

मुंबईतील सार्वजनिक मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का आहेत, असा सवाल पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित केला आहे. मुंबईकरांसाठी असलेल्या मोकळ्या जागांचा वापर खासगी संस्थांकडून कशा प्रकारे केला जात आहे, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. शहरातील मैदाने आणि उद्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असावीत, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का असा सवाल उपस्थित करतमुंबईतील मैदाने आणि उद्याने ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नयेत, तर मुंबईकरांसाठी खुली राहिली पाहिजेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने सन 2023 मध्ये तयार केलेल्या धोरणाचा मसुदा रद्द करून सर्व मैदाने व उद्याने महापालिकेनेच विकसित करावीत आणि त्यांची देखभालही महापालिकेनेच करावी, असे स्पष्ट निर्देश सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.(Mumbai Open Spaces)

मुंबईतील मैदाने व उद्यानांच्या प्रस्तावित धोरणाबाबत आज मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात महापौर रितू तावडे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत 1123 खेळाची मैदाने आणि 343 उद्याने आहेत. यापैकी 60 मैदाने दोन एकरांपेक्षा मोठी असून उर्वरित मैदाने दोन एकरांपेक्षा कमी क्षेत्रफळाची आहेत. यातील 1108 मैदाने महापालिकेनेच विकसित केली असून, 15 मैदाने 11 महिन्यांच्या करारावर खासगी संस्थांना देखभालीसाठी देण्यात आली आहेत. तसेच, 343 उद्यानांपैकी 336 उद्यानांची देखभाल महापालिकाच करीत असून, सात उद्याने खासगी संस्थांना देखभालीसाठी देण्यात आली आहेत. जुन्या धोरणानुसार 11 मैदाने काळजीवाहू तत्त्वावर, तर 18 मैदाने दत्तक तत्त्वावर खासगी संस्थांना देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या करारांची मुदत संपली आहे, अशी माहिती यावेळी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबई महापालिकेने ही मैदाने आणि उद्याने विकसित करून त्यांच्या देखभालीसाठी खासगी संस्थांना देण्याबाबत सन 2023 मध्ये धोरण तयार केले होते. त्यावर हरकती व सूचना मागवून हा धोरणाचा मसुदा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.(Ashish Shelar)

या प्रस्तावित धोरणाला विरोध दर्शवत आजच्या बैठकीत मुंबईकरांची मैदाने व उद्याने ही मुंबईकरांची मालमत्ता असून, ती कोणत्याही प्रकारे खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नयेत, अशी भूमिका आमदार अमित साटम आणि महापौर रितू तावडे यांनी मांडली. महापालिकेनेच ही मैदाने व उद्याने विकसित करून त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी. तसेच, तेथे चांगल्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशी भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर येत्या 60 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अमित साटम यांनी केली. त्यास सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सहमती दर्शवली.

निधी आणि मनुष्यबळ कमी

याबाबत महापालिका आयुक्तांनी सांगितले की, मैदाने व उद्याने महापालिकेनेच विकसित करण्यास हरकत नाही. मात्र, त्यांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेला निधी व मनुष्यबळ अपुरे आहे. तरीही, सीएसआर निधीतून आवश्यक निधी उभारून ही कामे करता येऊ शकतात, असे त्यांनी सूचित केले. त्यावर मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना केली.(Mangal Prabhat Lodha)

मुंबईतील मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा या मुंबईकरांच्या हक्काच्या आहेत. त्या त्यांच्याच हक्काच्या राहिल्या पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीत अन्य कुणाच्याही ताब्यात जाता कामा नयेत. याच भूमिकेतून यापुढे महापालिकेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >